नागपूर : प्रातपनगर परिसरात कामाचं आमिष दाखवून एका ५० वर्षीय महिलेवर बलात्कार करून दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले आहे. अवघ्या काही दिवसांत हा गंभीर गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी मोठं यश मिळवलं आहे.
घडलेली घटना धक्कादायक २२ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घरकाम करणाऱ्या महिलेच्या ओळखीला आलेल्या एका व्यक्तीने धार्मिक कामाचे कारण सांगत तिला ५०० रुपये देऊन भांडी घासण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला निर्जन इमारतीत घेऊन जाऊन आरोपीने जबरदस्ती बलात्कार केला. त्यानंतर सोन्याची चैन, कानातील दागिने व ३,५०० रुपये रोख असा एकूण मुद्देमाल लुटून तो फरार झाला.
पीडितेच्या तक्रारीवरून प्रातपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट ४, युनिट १, चैन स्नॅचिंग स्क्वॉड व सायबर सेलने मिळून तांत्रिक तपास सुरू केला. अखेर सापळा रचून आरोपी राजनीशकुमार रामकृपाल दुबे (५०), मूळ रेव्हा, मध्यप्रदेश, सध्या शिवशक्ती बारजवळ, जुन्या कामठी रोड, नागपूर येथील रहिवासी, याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला प्रातपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, संयुक्त आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, डीसीपी (डिटेक्शन) राहुल मकनिकर आणि एसीपी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.