Published On : Wed, May 20th, 2020

लॉकडाऊन दिशानिर्देशांचे पालन करणे संबंधीत आस्थापना प्रमुख व दुकानदारांची जवाबदारी

Advertisement

निर्देशांचे पालन न करण्या-या विरुध्द कारवाई करण्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे पोलीस विभागास निर्देश

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता देऊन शहरातील आर्थिक बाबींना चालना देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. आतापर्यंत मनपाने स्टॅन्डअलोन प्रकारची बांधकाम साहित्य, हार्डवेअर, होजियरी दुकाने, स्टेशनरी, इलेक्ट्रिकल, संगणक, मोबाईल आणि होम अप्लायंसेस दुरुस्तीची दुकाने अटी व शर्तीवर उघडण्यास दि. 17 मे च्या आदेशान्वये परवानगी दिली आहे.

सदर अनुज्ञेय दुकानदारांनी, आस्थापना प्रमुखांनी सोशल डिस्टनसींग, मास्कचा वापर, परिसर निर्जूंतीकरण करणे, सॅनिटॉझरचा वापर इ. निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून त्याच अटीवर सदर अनुज्ञेता करण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी कोव्हिड-१९ संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन होत नसल्याची बाब प्रशासनाच्या निर्दशनास आली आहे. जर दुकानदार, खासगी कार्यालयांनी दिशानिर्देशांचे पालन केले नाही तर त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता, आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण तसेच साथरोग नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

यासंदर्भातील आदेश मनपा आयुक्तांनी बुधवारी (ता. २०) जारी केले आहेत. मनपाच्या निदर्शनास आल्यानुसार, जी दुकाने सुरू झालेली आहेत, त्या दुकानांमध्ये दिशानिर्देशांचे पालन होत नाही. सामाजिक अंतर पाळले जात नाही, मास्क न वापऱणाऱ्यांनाही दुकानात प्रवेश दिला जातो, दुकानातील काही कर्मचारीसुद्धा मास्कचा वापर करीत नसल्याचे आढळून आले आहे. रात्री ७ वाजतानंतर संचारबंदीचे आदेश असताना ब-याच व्यक्ती विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळत आहेत. संबंधीत कार्यक्षेत्रात दिशानिर्देशांचे उल्लंघन होत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिशानिर्देशांचे पालन करणे आणि दुकानात येणाऱ्या ग्राहकांना नियमांचे पालन करण्यास भाग पाडणे, ही जबाबदारी पूर्णत: दुकानदारांची आहे. यापुढे यात कसूर होताना आढळल्यास संबंधित दुकानदारांच्या, आस्थापना प्रमुखांच्या तसेच संबंधीत बेजवाबादार व्यक्तींच्या विरोधात भादंवि १८६०, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त नागपूर यांना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले आहेत. हा आदेश लॉकडाऊन संपण्याच्या कालावधीपर्यंत अर्थात ३१ मे पर्यंत लागू राहणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

सद्यास्थितीत कोरोना विषाणू प्रार्दुभावाचा धोका पुर्णत: टळला नसल्याने सर्वांनी आवश्यक खबरदारी घेणे व नियमांचे पालन करणे आवश्यक असून सर्व संबंधीतांनी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले असून जे व्यक्ती, संस्था यांना सहकार्य करणार नाही व निर्देशांचे पालन करणार नाही त्यांचे विरुध्द कारवाई सुध्दा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.