कार्यकारी महापौर मनिषा कोठे यांचे निर्देश : शहरातील नालेसफाईच्या पाहणीसाठी केला दौरा
नागपूर : मनपा प्रशासनानी लॉकडाऊनच्या दरम्यान शहरातील नाले सफाई प्रारंभ केली आहे परंतू ती वेळेत पूर्ण झाली नाही तर पावसाळ्यात पूरसदृश परिस्थितीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे मनपा आयुक्तांनी तात्काळ अधिकाऱ्यांना निर्देश द्यावे आणि प्रशासनाने नालेसफाईची जी अपूर्ण कामे आहेत, ती तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश कार्यकारी महापौर मनिषा कोठे यांनी दिले.
नागपूर शहरातील नाल्यांच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी कार्यकारी महापौर मनिषा कोठे यांनी आशीनगर, मंगळवारी, हनुमाननगर आणि नेहरूनगर झोनमधील नाल्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, झोन सहायक आयुक्त, झोनल आरोग्य अधिकारी आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते. चारही झोनमध्ये नाल्यांची संख्या अधिक आहे. या झोनमधील नाल्यांची स्वच्छता अपूर्ण आहे. अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात मशिनरी उपलब्ध न झाल्याने अर्धवट स्वच्छता झाली आहे. अनेक नाले वस्त्यांमध्ये आहे. तेथे मशिनरी पोहचू शकत नसल्याने त्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येते या कार्यात अधिक मनुष्य बळाचा वापर करुन नाल्यांची पावसाळ्यांपूर्वी सफाई करण्याचे निर्देश महापौर मनिषा कोठे यांनी दिले.
नाला स्वच्छतेसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते. त्यामुळे मनपा आयुक्तांनी नाले सफाईसाठी विशेष निधीची तरतूद करून तात्काळ निधी उपलब्ध करवून द्यावा, असे निर्देश स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिले.
आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा म्हणाले, नालेसफाईमध्ये पारदर्शकता आणण्याची गरज आहे. झोनच्या अधिकाऱ्यांना लिखित निर्देश नाही दिले आहेत. नाले सफाईची स्थिती अशीच राहिली तर पावसाळ्यात नाले तुंबण्याची शक्यता आहे. यामुळे नागपूर शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नाले सफाईला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
