Published On : Wed, May 20th, 2020

लॉकडाऊनचा काळात रोजगार हमीमुळे विदर्भातील 4 लाख 10 हजार नागरिकांना काम

Advertisement

ग्रामीण भागातील बेरोजगारांना मिळाला हक्काचा रोजगार

जलसंधारणासह 18 हजार 694 कामांना मंजूरी

57 कोटी 50 लक्ष रुपये मजूरीचे वाटप

नागपूर : लॉकडाऊनमुळे राज्यात श्रमिकांच्या स्थलांतरासोबतच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असतांनाच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विदर्भातील सुमारे 4 लाख 10 हजार 457 नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जलसंधारणासह विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी 18 हजार 694 कामे प्रत्यक्ष सुरु झाले आहे. मनरेगा श्रमिकांच्या मदतीसाठी असून आतापर्यंत 57 कोटी 49 लक्ष 66 हजार रुपयाची मजूरी देण्यात आली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केंद्र शासनाने 100 दिवसाच्या रोजगाराची हमी दिली असतांना महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांना 365 दिवस कामाची हमी देण्याच्या महत्वपूर्ण निर्णय घेऊन राज्यातील हजारो ग्रामीण नागरिकांना दिलासा दिला आहे. रोजगार हमी योजनेवर मजूरीपोटी दरदिवशी 206 रुपये दिल्या जाते. यामध्ये वाढ करुन आता 238 रुपये मजूरी दिल्या जाते. त्यामुळे रोहयोच्या कामावर मोठ्या प्रमाणात नागरीक कामासाठी आकर्षित होत आहेत. आठवड्यातील सहा दिवस काम केल्यानंतर मस्टरनुसार 1 हजार 428 रुपये सरासरी मजूरी थेट बँक अथवा पोस्ट खात्यात जमा होत आहे.

नागपूर व अमरावती विभागातील 11 जिल्ह्यात रोजगार हमीची कामे प्राधान्याने सुरु करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना कामाची आवश्यकता लक्षात घेऊन ग्राम पंचायतनिहाय मोठ्या प्रमाणात विविध कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सध्या विदर्भात 18 हजार 694 कामे सुरु असून यावर 4 लाख 10 हजार 457 मजुरांची उपस्थिती आहे. सर्वाधिक रोजगार भंडारा जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्यात आला असून 1 हजार 308 कामांवर 1 लाख 47 हजार 927 मजूर उपस्थित आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात 2 हजार 913 कामे सुरु असून यावर 65 हजार 595 मजुरांची उपस्थिती आहे. मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यात आदिवासींसाठी विशेष कामे सुरु करण्यात आली आहे. यावर मोठ्या प्रमाणात मजुरांची उपस्थिती असल्याची माहिती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त ए.एस.आर.नायक यांनी दिले.

नागपूर विभाग
नागपूर विभागातील भंडारा जिल्ह्यात 1 हजार 308 कामे सुरु असून त्यावर 1 लाख 47 हजार 927 मजूर उपस्थित आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 हजार 138 कामांवर 53 हजार 683 मजूर, गडचिरोली जिल्ह्यात 1 हजार 350 कामांवर 31 हजार 381 मजूर, गोंदिया जिल्ह्यातील 2 हजार 196 कामांवर 60 हजार 778 मजूर, वर्धा जिल्ह्यातील 1 हजार 25 कामांवर 4 हजार 820 तर नागपूर जिल्ह्यातील 1 हजार 682 कामांवर 10 हजार 421 मजूरांची उपस्थिती आहे.

अमरावती विभाग
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात रोजगार हमीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आले असून यामध्ये अकोला जिल्ह्यात 870 कामांवर 3 हजार 926 मजूरांची उपस्थिती आहे. अमरावती 2 हजार 913 कामे यावर 65 हजार 595 मजूरांची उपस्थिती. बुलढाणा 1 हजार 795 कामे त्यावर 9 हजार 939 मजूरांची उपस्थिती. वाशिम 777 कामे 4 हजार 643 मजूरांची उपस्थिती. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील 2 हजार 640 कामांवर 17 हजार 344 मजूरांची उपस्थिती आहे.

रोजगार हमी योजनेवर उपस्थित राहणाऱ्या मजूराला आठवड्याचे मस्टर सादर केल्यानंतर त्यांच्या खात्यात थेट बँकेद्वारा मजूरी जमा करण्यात येते. विदर्भातील अकराही जिल्ह्यातील मजूरांना 57 कोटी 49 लाख 66 हजार रुपये मजूरीपोटी वितरीत करण्यात आले आहेत. मजूरीपोटी अमरावती जिल्ह्यात 16 कोटी 33 लाख, भंडारा 6 कोटी 6 लाख, चंद्रपूर 7 कोटी 18 लाख, गडचिरोली 6 कोटी 83 लाख, गोंदिया 2 कोटी 86 लाख, यवतमाळ 6 कोटी 10 लाख, अकोला 1 कोटी 51 लाख, बुलडाणा 2 कोटी 37 लाख, वर्धा 2 कोटी 76 लाख, वाशिम 98 लाख तर नागपूर जिल्ह्यात 3 कोटी 93 लाख रुपयाचा निधी खात्यात जमा करण्यात आला आहे.

कोरोनासंदर्भात आवश्यक दक्षता
कोरोनाचा प्रसार मजूरांमध्ये होणार नाही याची दक्षता घेऊन सोशल डिस्टसींग, मास्क घालणे तसेच सॅनीटायझर आदिंची सुविधा प्रत्येक कामांवर करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांनी मागणी केल्याबरोबर काम उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्यामुळे मागणी केल्याबरोबर गावातच काम उपलब्ध होत असल्याची माहिती मनरेगा आयुक्त के.एस.आर.नायक यांनी दिली.

रोजगार हमीतील सर्वाधिक कामे ग्राम पंचायत स्तरावर मंजूर करण्यात आली असून यामध्ये वैयक्तिक कामांचा समावेश आहे. जलसंधारणासोबतच फळबाग योजना, नाला सरळीकरण, सिंचन विहिरींचे बांधकाम, प्रधानमंत्री आवस योजनांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.