Published On : Sun, Apr 19th, 2020

आमदार खोपडे यांच्या मागणीला प्रतिसाद, कामगारांच्या खात्यात जमा झाले 2000

बांधकाम कामगारांनी पैसे काढण्यास बँकेत गर्दी करू नये : आ.कृष्णा खोपडे

BJP MLA Krishna Khopde
नागपूर : महाराष्ट्र सरकारचे कामगार मंत्री मा.दिलीप वलसे पाटील यांनी नोंद झालेल्या बांधकाम व इतर कामगारांच्या खात्यात रु.2,000/- जमा केल्याची माहिती माध्यमांना दिली असून कामगारांना या निर्णयामुळे थोडा तरी दिलासा नक्कीच मिळालेला आहे. कामगारांनी सुद्धा कोरोनाचे संकट लक्षात घेऊन पैसे काढण्याकरिता बँकेत जास्त गर्दी करू नये. पैसे खात्यातून कुठेच जाणार नाही, लॉकडाऊन संपल्यानंतरच पैसे काढावे, अशी अपील आमदार कृष्णा खोपडे यांनी कामगारांना केली आहे.

आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले कि, नागपूर शहरात विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक ठिकाणी शिबिरे लावून बांधकाम व इतर कामगारांची नोंद घेण्यात आली. एकट्या पूर्व नागपुरात 6000 च्या कामगारांची नोंद घेऊन त्यांना कामगारांचे साहित्य किटचे वाटप देखील करण्यात आले. कामगारांच्या खात्यात रु.5,000/- रकम टाकण्याचे अर्ज सुद्धा दाखल करण्यात आले. मात्र सरकार बदलताच महारष्ट्र बांधकाम व इतर कामगार मंडळाने सरकारच्या आदेशावरून दि.15/02/2020 रोजी पत्र काढून पैसे खात्यात टाकण्यास स्पष्ट नकार दिला. आता कोरोनामुळे हाच कामगार अडचणीत सापडला असताना आमदार कृष्णा खोपडे यांनी दि.26/03/2020 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री यांना ई-मेल व्दारे पत्र देऊन मंडळाचे आदेशास स्थगिती देऊन नोंद झालेल्या कामगारांच्या खात्यात रु.5,000/- जमा करण्याबाबत विनंती केली. विरोधी पक्ष नेते मा.देवेंद्र फडणवीस यांना देखील निवेदन दिले.

आमदार कृष्णा खोपडे यांनी स्वत: कामगार मंत्री दिलीप वलसे पाटील यांचेसोबत फोनवर चर्चा केली. तेव्हा सकारात्मक निर्णय घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. कामगार मंत्री यांनी मागणीला प्रतिसाद दिला खरा मात्र शासन निर्णयात बदल करून रु.5,000/- ऐवजी रु.2,000/- खात्यात जमा करून या कामगारांना दिलासा देण्याचे काम केले. त्यामुळे आमदार कृष्णा खोपडे यांनी त्यांचे आभार मानले व उर्वरित रु.3,000/- सुद्धा लवकरात लवकर जमा करावे, अशी विनंती देखील केली.

पूर्व नागपुरात नोंदणी झालेल्या जवळपास सर्वच बांधकाम कामगारांचे खात्यात रु.2000/- जमा केल्याचे कामगार मंत्री यांनी सांगितले आहे. उर्वरित रु.3000/- करिता आपण मागणी लावून धरू. मात्र जमा झालेले पैसे काढण्याकरिता गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स पाळावे. पैसे खात्यातून कुठेच जाणार नाही, लॉकडाऊन संपल्यानंतरच पैसे काढावे, अशी अपील आमदार कृष्णा खोपडे यांनी कामगारांना केली आहे.