Published On : Sun, Apr 19th, 2020

शासनाने कापूस खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत : बावनकुळे

-धानाला 700 रुपये बोनस
-हरभरा खरेदी हमीभावाने करा

नागपूर: लॉकडाऊनमुळे सुरू असलेल्या संचारबंदीमुळे कापूस व धान्य खरेदी केंद्रे बंद आहेत, त्याचा परिणाम शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने हमीभावाने कापूस खरेदी केंद्रे व शेतकऱ्यांचे अन्य धान्य विक्रीसाठी खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावी, अशी मागणी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना एक पत्र पाठवून बावनकुळे यांनी म्हटले आहे की, धानाला 700 रुपये प्रति क्विंटल बोनस तात्काळ द्यावा. हरबरा खरेदी 4875 रुपये या हमीभावाने ताबडतोब करावी. हरबरा शेतकऱ्यांच्या घरात आला आहे. पण खरेदी केंद्रे सुरू नसल्यामुळे शेतकरी हरबरा विकू शकत नाही. त्यामुळे त्वरित खरेदी केंद्रे सुरू करावीत.


कापसाचेही तसेच आहे. मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. कापूस खरेदी सुरू नसल्यामुळे शेतकरी कापूस विकू शकत नाही. 5550 रुपये या हमीभावाने शासनाने कापूस खरेदी सुरू करावी. यामुळे लॉक डाऊनच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल व त्यांची आर्थिक अडचणीतून सुटका होईल, अशी विनंती बावनकुळे यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे.

बावनकुळे यांचे पीएम केअर फंडाला 1 लाख रुपये
माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीएम केअर फंडाला 1 लाख रुपये मदत पाठविली आहे.
कोरोनाग्रस्तांसाठी शासन करीत असलेल्या उपाययोजनासाठी ही रक्कम पाठविली आहे.