Published On : Tue, Aug 8th, 2017

वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करा

नागपूर: शहरातील वीज ग्राहकांच्या तक्रारीची संख्या वाढू लागली असल्याने आपल्याकडून यासाठी कोणती उपाय योजना केली आहे याची माहिती सादर करण्याचे आदेश महावितरणने एसएनडीएलला आज दिले

वीज ग्राहकांच्या वाढत्या तक्रारीची दाखल महावितरण कडून घेण्यात आली आहे. आज या संदर्भात नागपूर परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता श्री. रफिक शेख यांच्या महावितरण आणि एसएनडीएलची बैठक झाली.

वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर उपाय योजना म्हणून वीज वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करणे, वाहिन्यांवर येणाऱ्या झाड्याच्या फांद्या तोडणे यात किती प्रगती झाली याची महावितरणकडून विचारणा करण्यात आली. शहरात ४००० ठिकाणी वीज वाहिन्यांचे मजबुतीकरण करण्याचा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे असे एसएनडीएल कडून सांगण्यात आले. वीज देयकाच्या संदर्भात ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढू लागल्या आहेत.

तक्रारीची संख्या कमी करण्यासाठी एसएनडीएलने आपला कर्मचारी वर्ग प्रशिक्षीत करावा, अशी सूचना महावितरणकडून करण्यात आली. भांडवली गुंतवणूक न केल्याने मोठ्या प्रमाणात वीज जोडण्या प्रलंबित आहेत यावर महावितरणकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सध्या एसएनडीएलकडून मोठ्या प्रमाणात वीज चोरी मोहीम राबवली जात आहे. ज्या वीज ग्राहकाची वीज चोरी पकडली त्याला पंचनामा आणि संबधीत कागदपत्रांची प्रत देण्यात यावी, असेही महावितरणकडून बजावण्यात आले.

ज्या वीज ग्राहकाने आपली श्रेणी बदलून मिळावी यासाठी अर्ज केला आहे अश्या वीज ग्राहकांवर कलाम १२६ नुसार कारवाई केली जात आहे. यावर महावितरण कडून नाराजी व्यक्त करण्यात आली.बैठीकीस अधीक्षक अभियंता मनीष वाठ , कार्यकारी अभियंता नीरज वैरागडे, एसएनडीएलचे तांत्रिक विभाग प्रमुख राजेश तुरकर , वाणिज्य प्रमुख धर्मेंद्र पाटील उपस्थित होते .