Published On : Mon, Dec 16th, 2019

प्रसाद सोसायटीतील दुर्गंधीचा अहवाल एक महिन्यात द्या!

महापौर संदीप जोशी यांचे निर्देश : तक्रार निवारण शिबिरातील आश्वासन पाळत केला दौरा

नागपूर : प्रभाग क्र. ३६ मधील प्रसाद सोसायटीतील एसटीपी केंद्रामधून प्रचंड दुर्गंधी येत असून नागरिक प्रचंड त्रासले आहेत. यासंदर्भात सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंत्यासह पाच जणांची समिती तयार करून एक महिन्याच्या आत अहवाल देण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

महापौर संदीप जोशी यांनी नागरिकांकडून झोननिहाय तक्रारी मागविल्यानंतर त्याच्या निराकरणाकरिता १२ डिसेंबर रोजी तक्रार निवारण शिबीर मनपा मुख्यालयात आयोजित केले होते. या शिबिरात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. ३६ मधील प्रसाद सोसायटी सोनेगाव आणि आझाद हिंद नगर येथील नागरिक तक्रार घेऊन आले होते. संपूर्ण परिसरातील नागरिकांची तक्रार असल्याने तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन १६ डिसेंबर रोजी दोन्ही भागाला भेट देण्याचे आश्वासन महापौर संदीप जोशी यांनी दिले होते.

त्यानुसार महापौरांनी सोमवारी (ता. १६) सकाळी ९ वाजता आझाद हिंद नगरला तर ९.३० ला प्रसाद सोसायटीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेविका पल्लवी शामकुळे, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, नगरसेवक लहुकुमार बेहते, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता धनराज मेंडुलकर उपस्थित होते.

प्रसाद सोसायटीत असलेल्या नाल्याच्या बाजूला सांडपाणी पुनर्प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात आले आहे. या एसटीपीतील इनटेक आणि आऊटलेटमध्ये काही बिघाड असल्याने तेथून प्रचंड दुर्गंधी येते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. महापौर संदीप जोशी यांनीही ही दुर्गंधी अनुभवली. तातडीने त्यांनी सहायक आयुक्त, कार्यकारी अभियंता व अन्य अशा पाच जणांची चमू तयार करून त्या चमूला एक महिन्यात याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश दिले. नागरिक जर वारंवार तक्रार करीत असेल तर त्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

आझाद हिंद नगर येथील नागरिकांनीही महापौर संदीप जोशी यांना परिसरातील समस्यांची जाणीव करवून दिली. त्या समस्याही तातडीने सोडविण्याचे निर्देश महापौरांनी दिले. परिसरातील उद्यानात ग्रीन जीम लावून देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.