मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे लॅब डॉक्टरांना सक्त निर्देश
नागपूर : नागपूर शहरातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी मनपाने चाचणीची गती वाढविली आहे. मात्र चाचणी केल्यानंतर रुग्ण कुणाच्याही संपर्कात येउ नये व त्याला त्वरीत उपचार मिळावे यासाठी चाचणीचा रिपोर्ट लवकर मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करीत सर्व शासकीय व खाजगी लॅबमधील कोरोना चाचणीचा रिपोर्ट २४ तासाच्या आत द्या, असे सक्त निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
रोजच्या वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येबाबत मनपा आयुक्तांनी सोमवारी (ता.१५) मनपा मुख्यालयातील ‘कोरोना वार रूम’मध्ये शहरातील सर्व शासकीय व खाजगी लॅबच्या डॉक्टरांची विशेष बैठक आयोजित केली होती. बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा, श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, डॉ. नरेन्द्र बहिरवार, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते.
लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रुग्णाला वेळेत उपचार मिळणे ही अत्यावश्यक बाब आहे. मात्र ज्यांना काहीही लक्षणे नाही असे बाधित इतरांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे कोरोनाचा रिपोर्ट लवकर मिळाल्यास संबंधित रुग्णांच्या उपचार आणि विलगीकरणाबाबत आवश्यक ती कार्यवाही जलद गतीने करणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने सर्व लॅबनी कार्यवाही करण्याचेही निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.
चाचणीसाठी येणा-या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करताना त्याचा संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक घेणे अनिवार्य आहे. पत्ता अचूक नसल्यास संबंधित रूग्णाचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ होउ शकणार नाही व रुग्णांची संख्या वाढतच राहिल. त्यामुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’मध्ये कुठलीही अडचण येउ नये यासाठी नागरिकांनीही आपला अचूक पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले. मनपाच्या कोरोना चाचणी केंद्रावर कार्यरत कर्मचा-यांनी नागरिकांचा पूर्ण पत्ता व्यवस्थित नमूद करणे आवश्यक आहे. याबाबत कुठल्याही प्रकारचा कामचुकारपणा निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचा-यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.