Published On : Tue, Feb 16th, 2021

दहा झोन सभापती पदासाठी १३ उमेदवारी अर्ज

Advertisement

आसीनगर सभापती पदासाठी तीन तर मंगळवारीसाठी दोन नामनिर्देशन पत्र : मंगळवारी होणार निवडणूक

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन सभापती पदासाठी सोमवारी (ता.१५) १३ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. विशेष म्हणजे, आसीनगर झोन सभापती पदासाठी तिघांनी तर मंगळवारी झोन सभापती पदासाठी दोघांनी उमेदवारी अर्ज सादर केले. मंगळवारी (ता.१६) पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये निगम सचिव डॉ. रंजना लाडे यांनी उमेदवारांचे अर्ज स्वीकारले. यावेळी अधीक्षक दत्तात्रय डहाके, वरिष्ठ लिपीक सुरेश शिवणकर, राजस्व निरीक्षक विलास धुर्वे आदी उपस्थित होते.

लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा व लकडगंज या आठ झोनच्या सभापती पदाकरिता फक्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. तर आसीनगर झोन करिता भाजपा, बहुजन समाज पार्टी व अपक्ष उमेदवाराने उमेदवारी दाखल केली व मंगळवारी झोन सभापतीपदाकरिता भाजपा आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज भरला.

लक्ष्मीनगर झोनच्या सभापतीपदासाठी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग ३६ च्या नगरसेविका पल्लवी शामकुळे पन्नासे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी माजी महापौर संदीप जोशी, नंदा जिचकार, नगरसेविका सोनाली कडू, मिनाक्षी तेलगोटे, जयश्री वाडीभस्मे, विशाखा मोहोड, वनिता दांडेकर, नगरसेवक लहुकुमार बेहते, किशोर वानखेडे यांची उपस्थिती होती.

धरमपेठ झोन सभापती पदासाठी प्रभाग १५चे नगरसेवक सुनील हिरणवार (भाजपा) यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यांच्या समर्थनात विद्यमान झोन सभापती अमर बागडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक प्रमोद कौरती, नगरसेविका शिल्पा धोटे व रूतिका मसराम उपस्थित होते.

हनुमान नगर झोन सभापती पदासाठी प्रभाग ३२ च्या नगरसेविका कल्पना कुंभलकर (भाजपा) यांनी उमेदवारी सादर केली. यावेळी स्थापत्य समिती सभापती अभय गोटेकर, नगरसेवक दिपक चौधरी, भगवान मेंढे, नगरसेविका मंगला खेकरे, लीला हाथीबेड, विद्या मडावी उपस्थित होते.

धंतोली झोन सभापती पदाचे उमेदवार म्हणून प्रभाग ३३ च्या नगरसेविका वंदना भगत (भाजपा) यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी विद्यमान झोन सभापती लता काडगाये, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, विशाखा मोहोड, भारती बुंडे उपस्थित होत्या.

नेहरूनगर झोन सभापती पदाकरिता प्रभाग ३० च्या नगरसेविका स्नेहल बिहारे (भाजपा) यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. त्यांच्या समर्थनात स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, विद्यमान झोन सभापती समिता चकोले, नगरसेविका रेखा साकोरे, वंदना भुरे, रिता मुळे उपस्थित होते.

गांधीबाग झोन सभापती पदाकरिता प्रभाग २२च्या नगरसेविका श्रद्धा पाठक (भाजपा) यांनी उमेदवारी सादर केली. यावेळी नगरसेवक मनोज चापले, नगरसेविका सरला नायक, विद्या कन्हेरे उपस्थित होते.

सतरंजीपुरा झोनच्या विद्यमान समिती सभापती प्रभाग ५च्या नगरसेविका अभिरूची राजगिरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरला. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण भिसीकर, नगरसेवक संजय चावरे, नगरसेविका शकुंतला पारवे उपस्थित होते.

लकडगंज झोन सभापती पदासाठी प्रभाग ४च्या नगरसेविका मनीषा अतकरे (भाजपा) यांनी उमेदवारी सादर केली. त्यांच्या समर्थनात उपमहापौर मनीषा धावडे, नगरसेविका वैशाली रोहनकर, निरंजना पाटील, कांता रारोकर, नगरसेवक शेषराव गोतमारे उपस्थित होते.

आसीनगर झोनच्या सभापतीपदाकरिता भाजपाकडून प्रभाग ३च्या नगरसेविका भाग्यश्री कानतोडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्या समर्थनात दुर्बल घटक समिती सभापती गोपीचंद कुमरे, नगरसेविका नसीम बानो इब्राहिम खान उपस्थित होते. तर बहुजन समाज पक्षाकडून प्रभाग ६च्या नगरसेविका वंदना चांदेकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी बसपा गटनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित होत्या. प्रभाग ७चे नगरसेवक मोहम्मद जमाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. त्यांच्या समर्थनात नगरसेवक परसराम मानवटकर, दिनेश यादव उपस्थित होते.

मंगळवारी झोन सभापती पदासाठी भाजपाकडून प्रभाग १च्या नगरसेविका प्रमिला मथरानी यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या समर्थनात सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, कर संकलन व कर आकारणी समिती सभापती महेंद्र धनविजय, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गि-हे, नगरसेविका अर्चना पाठक, सुषमा चौधरी उपस्थित होते. काँग्रेसकडून प्रभाग १०च्या नगरसेविका साक्षा राउत यांनीही मंगळवारी झोन सभापती पदासाठी अर्ज सादर केला.