Published On : Tue, Aug 16th, 2022

फुटाळ्यावर साकारली ‘राजपथ’ची प्रतिकृती

Advertisement

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : एकाचवेळी हजारोंनी गायले राष्ट्रगीत

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी सोमवारी १५ ऑगस्ट रोजी नागपूरमधील फुटाळा तलाव येथे हजारो नागरिकांनी एकत्र येत एकाचवेळी राष्ट्रगीत गायन केले आणि दिल्लीतील ‘राजपथ’ ची प्रतिकृती साकारली. यावेळी एकाचवेळी ७५ राष्ट्रध्वजांचे ध्वजारोहण करण्यात आले.

नागपूर महानगरपालिका आणि एक वादळ भारताचं यांच्या वतीने हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला. या उपक्रमाला मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी भेट दिली. यावेळी उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, क्रीडा अधिकारी श्री. पीयूष आंबुलकर आदी उपस्थित होते.

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूर महानगरपालिका आणि एक वादळ भारताचं यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण नागपूरकरांना १० वाजून ३० मिनिटांनी एकसाथ सामुहिक राष्ट्रगीत म्हणण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून फुटाळा तलाव येथे सामूहिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ९ वाजतापासून ढोलताशांच्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली. सोबतच ७५ राष्ट्रध्वजांचे एकसाथ ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमात शिवराजे आणि एकदंत ढोलताशा पथक, शिवशक्ती आखाडा, सीआरपी ग्रुप नागपूर तसेच लालसिंग स्पोर्ट्स अकादमी च्या विद्यार्थ्यांनी स्केटींग डान्स करीत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रास्ता फाऊंडेशनतर्फे पथनाट्य व सेव्हड्रीम तर्फे रोप स्कीपिंगची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

एक वादळ भारताचं चळवळीच्या ४५० स्वयंसेवकांनी संपूर्ण उपक्रमासाठी सहकार्य केले. रस्त्यावरील संपूर्ण नियोजन या स्वयंसेवकांनी हाताळले.