
नागपूर :लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी राणा प्रताप नगर पोलिसांनी २६ वर्षीय युवकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचे नाव प्रकाश पुरूषोत्तम बाहेकर (२६), रा. कामगार कॉलनी असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये एका कौटुंबिक लग्नसमारंभात पीडितेची आरोपीशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये नियमित संपर्क सुरू झाला. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेला लग्नाचे आश्वासन दिले.
तिचा विश्वास संपादन करून आरोपीने ३० मे २०२३ (रात्री ८ वाजता) ते १२ नोव्हेंबर २०२५ (सकाळी १०.४५ वाजेपर्यंत) या कालावधीत शहरातील विविध हॉटेल्समध्ये तिला बोलावून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध केले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
लग्नाबाबत दबाव आणल्यावर आरोपीने पीडितेला मारहाण केल्याचा, तसेच जीव घेण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अखेर त्याने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.
तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 69, 115(2) आणि 351(3) अंतर्गत आरोपी बाहेकरविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.









