
नागपूर – नंदनवन येथील महिला महाविद्यालयात जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘जनजाती गौरव दिन’ कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राष्ट्रपाल गणवीर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक रोशन गेडाम हे होते. श्री. रोशन गेडाम यांनी आपल्या मार्गदर्शनात बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर विस्तृत प्रकाश टाकला तसेच बिरसा मुंडा हे एक महान स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि अध्यात्मिक महापुरुष होते अशी त्यांच्या कार्याची ओळख करुन दिली.
बिरसा मुंडा यांनी अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये ब्रिटिशांच्या जुलमी, क्रुर, जमीनदारी पध्दती विरुद्ध आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या धर्मांतर प्रवृत्ती विरूद्ध ‘मुंडा उलगुलान’ लढ्याद्वारे ‘आमची जमीन- आमचे राज्य’ हा नारा देऊन आपल्या मातृभूमीचे रक्षण करताना बलीदान दिले असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राष्ट्रपाल गणवीर यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना आवाहन केले की, आपण देखील बिरसा मुंडा यांच्या प्रमाणेच 25 वर्षा आतील तरुण आहात आणि अशा वयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने वैधानिक कार्यावर लक्ष केंद्रित करून आपल्या कुटुंबाला व आपल्या समाजाला पुढे घेऊन गेले पाहिजे, जेणेकरून भारत देशाला एक नवीन ओळख निर्माण होईल याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले पाहिजे आणि राष्ट्राला योग्य दिशेने नेण्यासाठी आपली उचित भूमिका बजाविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. चंद्रशेखर गित्ते यांनी केले तर प्रस्ताविक डॉ. मंगला गोरे यांनी मांडले. कार्यक्रमाचे आभार डॉ. वनिता बेले यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला तर महाविद्यालयातील सर्व स्टाफ आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमित तितरे, डॉ. लिना गादेवार यांनी मेहनत घेतली.










