आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश : समन्वयन समितीची पहिली बैठक
नागपूर: नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. विविध शासकीय यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहरात खड्डे मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे. हे सर्व खड्डे सात दिवसाच्या आत दुरूस्त करण्यात यावे, असे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
नागपूर शहरांमध्ये शासकीय यंत्रणेसंदर्भातील खड्डे दुरूस्ती संदर्भात समन्वयन समिती गठीत करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक आयुक्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता.२१) मनपा मुख्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशाकीय इमारतीमध्ये आयोजित करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह समितीचे सदस्य सचिव मनपा अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, एनएमआरसीएलचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक, अधीक्षक अभियंता, एमएसइडीसीएल, मनपा जलप्रदाय, विद्युत, हॉटमिक्सचे कार्यकारी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.
नागपूर शहरात विविध शासकीय यंत्रणेच्या मालकीचे रस्ते असून काही रस्त्यांवर विविध यंत्रणेद्वारे मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांमुळे ठिकठिकाणी खड्डे करण्यात येत असतात. या कामांच्या निर्मिती साठी अवजड यंत्रसामुग्री व साहित्य रस्त्यावर असते जेणेकरून वाहतूकीला अडथळा निर्माण होतो. याकामाचा समन्वय साधण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
शहरात सुरू असणाऱ्या विविध कामांचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला. नागपूर महानगरपालिका व अन्य शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात आलेले खड्डेही पुढील सात दिवसाच्या आत बुजविण्यात यावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. नासुप्र क्षेत्रातील खड्डे हे नासुप्रच्या हॉटमिक्स विभागाने बुजविण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. पूर्व व उत्तर भागातील खड्डे नासुप्रच्या हॉटमिक्स विभागाने करावे, त्याचे देयके मनपा करेल, असेही आयुक्त श्री.बांगर यांनी सांगितले. एमएसईडीसीएल विभागाने त्यांच्या विभागाद्वारे केबल टाकण्यासाठी केलेल खोदकाम सात दिवसाच्या आत दुरूस्त करण्यात यावे, असे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. यानंतर खड्डे करण्यापूर्वी नागपूर महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
महामेट्रोची कामे सुरू असलेल्या खड्ड्याची दुरूस्ती
१) वर्धा रोड – विमानतळ ते आरबीआय चौक
२) कामठी रोड – ऑटीमोटिव्ह चौक ते आरबीआय चौक
३) भंडारा रोड – भंडारा नाका ते संत तुकाराम चौक ते प्रजापती चौक
४) सेंट्रल ॲव्हेन्यू – प्रजापती चौक ते रामझुला
५) कॉटन मार्केट रोड – रामझुला ते कॉटन मार्केट चौक
६) बर्डी रोड – कॉटन मार्केट चौक ते बर्डी मेट्रो स्टेशन ते व्हेरायटी चौक
७) उत्तर अंबाझरी मार्ग – सीताबर्डी मेट्रो रेल्वे स्टेशन ते अंबाझरी टी पॉईंट
८) हिंगणा रोड – अंबाझरी टी पॉईंट ते सुभाष नगर स्टेशन ते हिंगणा नाका
९) हम्पयार्ड रस्ता – धंतोली पुलापासून अजनी रेल्वे स्टेशन
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची उड्डाण पुलाची कामे
१) पारडी उड्डाण पूल – भंडारा नाका ते संत तुकाराम चौक ते रिंग रोडवरील एपीएमसी चौक
२) संत तुकाराम चौक ते प्रजापती चौक ते संघर्षनगर चौक रिंग रोड
३) काटोल रोड – एमएसईबी चौक ते छावणी चौक ते सखाराम चौक
४) भंडारा रोड – सीमेंट रस्त्याचे बांधकाम – सुनील हॉटेल ते पारडी नाका
राष्ट्रीय महामार्ग डिव्हिजन अखत्यारितील रस्ते
१) अमरावती रोड – व्हेराईटी चोक ते वाडी नाका
२) ऑटोमोटिव्ह चौक ते कामठी रोड नाका
सार्वजनिक बांधकाम विभाग
१) रिंग रोड – सीमेंट रोड बांधकाम सुरू असून अर्धवट कामाचे रस्त्यांवरील खड्डे दुरूस्ती
२) म्हाळगी नगर चौक ते पिपळा फाटा
३) गोधणी रोड
४) सा.बां विभागाचे शहरातील इतर रस्ते
एमएसईडीसीएलची कामे
१) अलंकार टॉकीज चौक ते आरपीटीएस रोड टी पॉईंट मार्गावरील रस्ते खोदकाम
२) व्हि.सीए चौक ते महाराजबाग पर्यंत
३) आरपीडीएस अंतर्गत परवानगी देण्यात आलेले दक्षिण पश्चिम क्षेत्रातील अंतर्गत रस्ते व इतर सर्व परवानगी
४) हुडकेश्वर नरसाळा भागातील रस्ते खोदकाम
नागपूर सुधार प्रन्यासचे अखत्यारितील रस्ते
१) मनीष नगर भागातील मुख्य रस्ते
२) रिंग रोड पासून बेसा बेलतरोडी भागाकडे जाणारे मुख्य रस्ते
३) कळमना औद्योगिक क्षेत्रातील रस्ते
४) ५७२ व १९०० अभिन्यासातील मनपास हस्तांतरित न झालेल्या अभिन्यासातील रस्ते
५) गुंठेवारी अभिन्यास अंतर्गातील रस्ते