ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रशासनाने ग्राहकाभिमुख व्हावे –संजीव कुमार
नागपूर : ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी प्रशासनाने ग्राहकाभिमुख होण्याची आवश्यकता असून महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यादृष्टिने आपले कर्तव्य अधिक चांगल्याप्रकारे पार पाडावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणच्या मुंबईस्थित मुख्यालयात राज्यातील सर्व प्रादेशिक संचालक व मुख्य अभियंत्यांच्या आढावा बैठकीत केले.
महावितरणच्यावतीने राज्यभरातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा करण्यात येतो. ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी यासाठी महावितरणने बहुतांश ग्राहकसेवा ऑनलाईन केलेल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्यावतीने ग्राहकांची कामे ऑनलाईनच करण्यात येतात. तरी देखील काही कारणाने ग्राहकांच्या तक्रारी प्रलंबित राहत असतील तर अशा तक्रारींच्या निवारणासाठी मुख्य अभियंत्यांनी मंडलस्तरापासून तर उपविभागीय स्तरापर्यंत सदर कामांचा सातत्याने आढावा घ्यावा व ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा द्यावी, असे निर्देश संजीव कुमार यांनी दिले.
महावितरण मोबाईल अँप्सचा ग्राहकांनी जास्तीत जास्त वापर करावा यासाठी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांमध्ये जागृती करावी. महावितरणच्या ऑनलाईन सेवांबाबत ग्राहक जेवढे जागृत होतील तेवढ्या प्रमाणात ग्राहकांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल. याशिवाय, विविध कामांसाठी वीजपुरवठा बंद करताना त्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळेल याबाबत खबरदारी घ्यावी. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही. महावितरणकडे मीटरचा तुटवडा नसून नादुरुस्त वीजमीटर त्वरित बदलण्याचे निर्देशही संजीव कुमार यांनी दिले. या बैठकीला महावितरणचे सर्व संचालक, प्रादेशिक संचालक, कार्यकारी संचालक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.