Published On : Tue, Feb 18th, 2020

रेणुका माता मंदिराला 1.20 लाख परत करण्याचे न्यायालयाचे आदेश

वर्षभरापूर्वी दानपेटीतून झाली होती चोरी

नागपूर: सुमारे वर्षभरापूर्वी यशोदानगर हिंगणा रोड येथील रेणुका माता मंदिरातील दानपेटी फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोख लांबविली होती. पोलिसांनी चोरट्यांकडून 1,20,200 रुपये जप्त केले. ही संपूर्ण रक्कम रेणुका माता मंदिर ट्रस्टला परत करण्याचे आदेश बालसुधार न्यायालयाने एमआयडीसी पोलिसांना दिले आहे. ही रक्कम पोलिसांना संस्थांनच्या बँकेतील खात्यात जमा करावयाची आहे.

न्यायालयाच्या प्रधान दंडाधिकारी शर्वरी जोशी यांनी ही रक्कम परत करण्याचे आदेश पोलिसांना दिले. चोरी करणारे सराईत बाल गुन्हेगार आहेत. एकूण 3 मुलांनी मिळून ही चोरी केली होती. या प्रक़रणी चोरीच्या तपासाचा पाठपुरावा संस्थानचे अध्यक्ष सुधीर देऊळगावकर यांनी केला. अशाच प्रकारच्या चोर्‍या या बाल गुन्हेगारांनी अनेक ठिकाणी केल्याचे निष्पन्न पोलिस तपासात आढळले आहे.

संस्थानचे अध्यक्ष सुधीर देऊळगावकर यांनी पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, गुन्हे शाखेचे उपायुक्त भरणे, यांचे अभिनंदन तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व अन्य कर्मचार्‍यांचे आभार मानले आहे.