Published On : Fri, Nov 24th, 2017

‘साई’ केंद्राच्या मार्गातील अडचणी तातडीने दूर करा


नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून वाठोडा येथे निर्माण करण्यात येणाऱ्या ‘साई’च्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे दीनदयाल उपाध्याय विभागीय केंद्र हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’आहे. या मार्गातील जमिनीच्या व अन्य अडचणी तातडीने दूर करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत आणि केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या बोर्ड ऑफ गव्हर्निंग बॉडीच्या सदस्य राणी द्विवेदी यांच्या उपस्थितीत क्रीडा संकुल निर्माण कार्याशी संबंधित असलेल्या विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक गुरुवारी (ता. २३) महापौर कक्षात पार पडली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, कार्यकारी अभियंता पी. जे. कोहाडे, सहायक अभियंता व्ही. एस. घुसे, सहायक अभियंता पी.पी. मोरे आदी उपस्थित होते.

सदर प्रकल्पासंदर्भात नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि युवा कार्य व क्रीडा मंत्री राजवर्धन राठोड यांच्या उपस्थितीत बैठक झाली. सदर बैठकीत महापौर नंदा जिचकार आणि श्रीमती राणी द्विवेदी उपस्थित होत्या. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत प्रारंभी प्रकल्पाची सद्यस्थिती अधिकाऱ्यांनी सांगितली. या प्रकल्पाचे प्राथमिक काम सुरू करण्याच्या दृष्टीने निधीच्या उपलब्धतेबद्दल श्रीमती राणी द्विवेदी यांनी माहिती दिली. या प्रकल्पासंदर्भातील सर्व प्राथमिक बाबी लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांनी दिली.


वाठोडा येथील साई विभागीय केंद्र पुढील तीन वर्षात तयार होईल, या दृष्टीने कामाला लागा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. आवश्यक त्या सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करा. संबंधित विभागांसोबत संयुक्त बैठका घेऊन अडचणी दूर करा, असेही निर्देश त्यांनी दिले.
कसे राहील क्रीडा संकुल?

नागपुरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले दीनदयाल उपाध्याय विभागीय क्रीडा केंद्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संकुल राहणार आहे. ऑलम्पिकच्या धर्तीवर येथे क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १४० एकरच्या विस्तीर्ण परिसरात निर्माण होणाऱ्या या क्रीडा संकुलातून आंतरराष्ट्रीय खेळाडू, रेफरी, प्रशिक्षक तयार होतील, अशी व्यवस्था राहणार आहे. याच संकुलात ग्रंथालय, खेळ संग्रहालय, खेळ विज्ञान केंद्र साकारण्यात येणार आहे. खेळाडूंच्या मानसिक, शारीरिक विकासावर या केंद्रातून भर देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा होऊ शकेल, असे हे स्टेडियम राहणार आहे.