नागपूर – “धर्म हा केवळ ईश्वरपूजेसाठी नसून, समाजकल्याणासाठी आहे. धर्माचे कार्य पवित्र आहे आणि जो समाज धर्माच्या मार्गावर चालतो, तिथे संघर्ष नव्हे तर शांती असते,” असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.
नागपूरमध्ये ‘धर्म जागरण न्यास’च्या प्रांतीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी धर्म, कर्तव्य, एकता आणि मानवतेच्या मूल्यांवर त्यांनी सखोल विचार मांडले.
धर्म म्हणजे समाजाला जोडणारा सूत्रधार-
भागवत म्हणाले, “धर्म म्हणजे केवळ धार्मिक पूजा, अनुष्ठान किंवा उपासना नव्हे, तर एक जीवनमार्ग आहे. धर्म म्हणजे कर्तव्य ज्यामध्ये पितृधर्म, मातृधर्म, पुत्रधर्म, प्रजाधर्म आणि राजधर्म यांचा समावेश आहे. अनेकांनी धर्मासाठी बलिदान दिले आहे, अगदी सामान्य माणसांनीही प्राण अर्पण केले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “धर्म हा गुरुत्वाकर्षणासारखा आहे. आपण तो मानो वा न मानो, तो अस्तित्वात असतो. जो धर्माचे पालन करतो, तो संकटातून वाचतो; पण जो धर्माचा भंग करतो, तो संकटात सापडतो.”
छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण-
छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देताना भागवत म्हणाले, “शिवरायांनी धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत कठीण प्रसंगांना तोंड दिले. त्यांनी सामर्थ्य, धैर्य आणि रणनितीच्या जोरावर मार्ग शोधला. त्यांचा संघर्ष आणि त्यामागील धर्मनिष्ठा ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणली जात आहे.”
जागतिक संघर्षांमागे धर्माचा अभाव-
“आजच्या जागतिक संघर्षांचं मूळ धर्माच्या अभावात आहे. जिथे धर्म नाही, तिथे संघर्ष असतो. म्हणूनच हिंदू धर्म हा केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मानवतेचा धर्म आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “जो धर्म मानवतेचे आचरण शिकवतो, तोच खरा धर्म आहे. असा धर्म जगापुढे आदर्श म्हणून उभा राहू शकतो.”
विविधतेत एकतेचा संदेश-
भारतीय समाजाची विविधता हीच त्याची शक्ती असल्याचे सांगताना भागवत म्हणाले, “सर्वांसारखे असणे ही एकतेची अट नाही. मतभेद असूनही आपण एकत्र राहू शकतो. हाच भारतीयतेचा आत्मा आहे.”
धर्म जागरण म्हणजे सामाजिक बांधिलकी-
धर्म जागरण म्हणजे फक्त ग्रंथातील गोष्टी नव्हे, तर प्रत्यक्ष आचरणातून शिकविल्या जाणाऱ्या मूल्यांची जाणीव आहे. धर्माचे पालन वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या समारोपास त्यांनी जोर देऊन सांगितले की, धर्म वाचेल, तर समाज वाचेल; समाज वाचेल, तर राष्ट्र बळकट होईल.