मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य कर्जदारांसाठी मोठा दिलासा देत रेपो दरात ०.५० टक्क्यांची कपात जाहीर केली आहे. त्यामुळे बँकांकडून दिल्या जाणाऱ्या गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात लवकरच घट होण्याची शक्यता आहे. नवीन दरानुसार रेपो रेट आता ५.५० टक्क्यांवर आला असून, हा निर्णय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला.
ही कपात ४ जूनपासून सुरू असलेल्या मौद्रिक धोरण समितीच्या बैठकीनंतर करण्यात आली असून, यंदाच्या वर्षातील ही तिसरी कपात आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात ०.२५ टक्क्यांची आणि एप्रिलमध्ये आणखी ०.२५ टक्क्यांची कपात करण्यात आली होती. म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण १ टक्क्यांची कपात झाली आहे. जवळपास पाच वर्षांनंतर आरबीआयने अशी सलग कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
रेपो दरात कपात झाल्यानंतर बँकांना आरबीआयकडून कर्ज घेणे स्वस्त होते. परिणामी, बँकांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या व्याजदरात घट केली जाते. याचा थेट फायदा गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच ग्राहक कर्ज घेणाऱ्या नागरिकांना होणार आहे. यामुळे घर खरेदी करणे अधिक परवडणारे ठरण्याची शक्यता आहे, असा अंदाज रिअल इस्टेट क्षेत्रात व्यक्त केला जात आहे.
गृहकर्जाची ईएमआय कमी होण्याची शक्यता असल्याने घर खरेदीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल. त्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी हा काळ फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, अर्थव्यवस्थेला गती मिळवून देण्यासाठी ही पावले महत्त्वाची ठरतील, असं मत व्यक्त केलं आहे.