नागपूर – नागपूरमधील बहुचर्चित सीताबर्डी टनेल प्रकल्पाला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी या प्रकल्पावर तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, योग्य टप्प्यावर आवश्यक आदेश दिले जातील.
या प्रकरणात न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका (PIL) दाखल करत दखल घेतली होती. यावर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
दरम्यान, पर्यावरण कार्यकर्ते जयदीप दास यांनी या प्रकल्पासंदर्भात हस्तक्षेप याचिका दाखल करून विविध पर्यावरणीय मुद्दे उपस्थित केले. त्यांनी प्रकल्पाच्या कामावर तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा तात्पुरत्या स्थगितीचा अर्ज फेटाळला असून पुढील सुनावणी १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.
सीताबर्डीतील मानस चौक ते सिव्हिल लाईन्समधील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चौक दरम्यान प्रस्तावित असलेला हा टनेल प्रकल्प शहरातील वाहतूक व्यवस्थेतील अडथळे कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात न्यायालयाच्या मदतीसाठी अॅड. कुलदीप महाले यांची अॅमिकस क्युरी (न्यायालय मित्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.