Published On : Mon, Jul 15th, 2019

महापौरांच्या हस्ते मनपा शिक्षण विभागाच्या सीडीचे विमोचन

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या सीडी चे सोमवारी (ता.१५) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

महापौर कक्षामध्ये आयोजित समारंभात महापौर नंदा जिचकार यांच्यासह शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, समिती सदस्या रिता मुळे, सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, प्रिती बंदावार, सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या शाळांच्या गुणात्मक, दर्जात्मक व संख्यात्मक वाढीसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती सीडी द्वारे देण्यात आली आहे. याशिवाय मनपा शाळांतील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात हॉकी, कबड्डी, खो-खो, सायकलिंग, ज्युडो आदी क्रीडा प्रकारात जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर नाव लौकीक केले आहे.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना महापौर सुवर्ण पदकाने गौरान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणाठी शाळांमध्ये स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने उपयुक्त अशा अनेक योजना व उपक्रमांची माहिती सीडी द्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र सुके यांनी केले.