Published On : Tue, Jul 9th, 2019

उद्योगांसाठी राख वापराबाबतच्या जाचक अटी शिथिल करा : ऊर्जामंत्री

महाजेम्सची आढावा बैठक

नागपूर: वीजनिर्मिती केंद्राच्या राखेचा वापर उद्योगांनी करावा यासाठी ठरविण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज महाजेम्सच्या प्रशासनाला दिले

बिजलीनगर येथे महाजेम्सची आढावा बैठक ऊर्जामंत्र्यांनी नुकतीच घेतली. याप्रसंगी कोराडी व चंद्रपूर वीजनिर्मिती केंद्र येथे राखेवर आधारित उद्योगांसाठ़ी क्लस्टर स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. क्लस्टर निर्माण झाल्यानंतर त्यात देण्यात येणार्‍या नागरी सुविधा लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत कोराडी व चंद्रपूर फ्लाय अ‍ॅशसंबंधी ठळक मुद्दे चर्चिले गेले.

बैठकीदरम्यान महाजेम्सतर्फे कार्यकारी अभियंता किनाके यांनी कोराडी क्लस्टरबाबत सादरीकरणातून माहिती दिली. राखेवर आधारित उद्योगांद्वारे कोराडी येथील फ्लाय अ‍ॅशची उपयोगिता वाढणार आहे. यावेळी राख परिषदेचे तज्ञ सदस्य सुधीर पालीवाल यांनी कोराडी येथील क्लस्टरमध्ये उद्योगांना लागणार्‍या सुविधांबाबत सादरीकरण केले. तसेच चंद्रपूर येथील प्रस्तावित फ्लाय अ‍ॅश क्लस्टरच्या जागेसंबंधी महाजेम्सचे कार्यकारी अभियंता डी. वाय चौधरी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

या बैठकीत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी क्लस्टरच्या विविध कामांना व पायाभूत सुविधा देण्याच्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. बैठकीला महाजेम्सचे संचालक कैलास चिरूटकर, मुख्य अभियंता राजेश पाटील,राजकुमार तासकर, राजू घुगे, उपमुख्य अभियंता सुखदेव सोनकुसरे व अन्य अधिकारी उपस्थित होते. ऊर्जामंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार शेखर अमीन, सुधीर पालीवाल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रतिनिधी हेमा देशपांडे, जिल्हा उद्योग केंद्रातर्फे महाव्यवस्थापक गजेंद्रभारती, उपस्थित होते. राख उद्योग उभारू इच्छिणार्‍या कंपन्यांचे प्रतिनिधी गिरधारी मंत्री, आशिष वांधीले, शेखर जिचकार, राहुल नेमाडे, अनिल गोठी, चेतन कांबळे यावेळी उपस्थित होते.