Published On : Sat, Oct 19th, 2019

नोंदणीकृत खासगी रुग्णालय, दवाखान्यांनी डेंग्यूच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक

Advertisement

आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश : माहिती न देणा-या डॉक्टरांवर होणार कारवाई

नागपूर: डेंग्यूबाबत मनपातर्फे करण्यात येणा-या उपाययोजनांसह जनजागृती महत्वाची आहे. याशिवाय शहरातील मनपा रुग्णालये, शासकीय रुग्णालयांमधील डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला दिली जाते. मात्र काही खासगी रुग्णालय, दवाखान्यांमध्ये येणा-या रुग्णांची माहिती दिली जात नाही. डेंग्यूवर उपाययोजना करण्यासाठी, रुग्णांची योग्य आकडेवारी मिळण्यासाठी आता खासगी रुग्णालये, दवाखान्यांमधील डेंग्यूच्या रुग्णांची संबंधित खासगी डॉक्टर्सनी माहिती देणे बंधनकारक आहे. अशा स्वरूपाची माहिती न दिल्यास संबंधित खासगी डॉक्टर्सवर कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

डेंग्यू संदर्भात शहरात राबविण्यात येणा-या उपाययोजनांचा शनिवारी (ता.१९) मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांकडून आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहामध्ये आयोजित बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ.सरीता कामदार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, हत्तीरोग अधिकारी दिपाली नासरे आदी उपस्थित होते.

शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मिळावी त्यांच्याकडून रुग्णांचे नमूने चाचणीसाठी पाठविण्यात येणे आवश्यक आहे. यासाठी शहरातील सर्व खासगी रुग्णालये, दवाखान्यांमधील डॉक्टरांना आवाहन करण्याची गरज आहे. अशा डॉक्टर्सना सोशल मिडीया व वर्तमानपत्राच्या माध्यमातून वेळोवेळी रुग्णांच्या दैनंदिन केसची माहिती, नमूने देण्याचे आवाहन करण्यात यावे. खासगी डॉक्टर्ससह सामान्य नागरिकही डेंग्यूबाबत जागरुक असणे आवश्यक आहे. यासाठी मनपाच्या झोनस्तरावरील चमू मार्फत विविध वस्त्या, सदनीकांमध्ये भेट देउन तिथे डेंग्यू होण्याची कारणे, लक्षणे व घ्यावयाची काळजी आदी बाबत जनजागृती करण्यात यावी. सदनीका, वस्त्यांमध्ये तसेच गर्दीच्या ठिकाणी डेंग्यूबाबत जनजागृती करणारे फलक, पोस्टर्स लावण्याचेही निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

व्‍हॉट्सॲप, ई-मेल वर नोंदवा तक्रार
खासगी रुग्णालये, दवाखाने तसेच नागरिकांच्या डेंग्यू संदर्भात काही तक्रारी असल्यास त्या तक्रारी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नोंदविता येणार आहेत. डेंग्यूबाबत तक्रार अथवा माहिती हवी असल्यास मनपाच्या 9607942809 या व्‍हॉट्सॲप क्रमांकावर किंवा vbdcomplaints.nmc@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अथवा https://m.facebook.com/nmcngp/ या फेसबुक पेजवर आणि https://twitter.com/ngpnmc या ट्विटर पेजवर नोंदविता येईल.