Published On : Mon, Jun 7th, 2021

ऑनलाईन नोंदणी करा, शासकीय योजनांचा लाभ घ्या…!

Advertisement

महापौरांचे दिव्यांगांना आवाहन : ऑनलाईन नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ

नागपूर : दिव्यांगांसाठी शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध योजना आहेत. त्यासाठी दिव्यांगांना नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी प्रत्येकवेळी मनपा कार्यालयात यावे लागते. त्यांचा हा त्रास वाचविण्यासाठी आणि विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी दिव्यांगांच्या ऑनलाईन नोंदणीला सोमवारपासून (दि. ७) सुरुवात करण्यात येत आहे. यामुळे पारदर्शकता वाढणार असून अखेरच्या घटकाला योजनांचा लाभ मिळेल. त्यामुळे शहरातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

सन २०२१-२२ मध्ये प्रत्येक दिव्यांगांची ऑनलाईन नोंदणी करण्याचा शुभारंभ मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित एका छोटेखानी समारंभात करण्यात आला. महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी, महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नगरसेवक दिनेश यादव, नगरसेवक मो. जमाल, छत्रपती, द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त राजेश भगत, समाजविकास अधिकारी दिनकर उमरेडकर उपस्थित होते.

दिव्यांगांसाठी ऑनलाईन नोंदणी ही त्यांच्याच फायद्यासाठी आहे. त्यांना त्रास होऊ नये, आणि जास्तीत जास्त योजनांचा त्यांना लाभ मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे. विशेष म्हणजे या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. प्रत्येक दिव्यांगाला याची माहिती व्हावी यासाठी समाजविकास विभागाने विविध माध्यमातून जनजागृती करावी. प्रत्येक झोनमध्ये समुदाय संघटक आहेत. ज्यांना ऑनलाईन नोंदणीमध्ये अडचण येत असेल त्यांनी समुदाय संघटकांची मदत घ्यावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

महापौर म्हणाले कि मनपा च्या सर्व झोन कार्यालयांमध्ये या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत देण्यासाठी दिव्यांग सुविधा केंद्र सुरु करावे. आशा वर्कर च्या माध्यमातून सुद्धा हि माहिती दिव्यांगांना देण्यात यावी. प्रत्येक झोन कार्यालयात त्यांना फॉर्म भरण्यासाठी मुभा देण्यात यावी तसेच महा ई पोर्टल च्या माध्यमातून त्यांना ही सुविधा प्रदान करण्यात यावी.

महापौरांनी दिव्यांगांना दिल्या जाणा-या अर्थ साहाय्य योजेनेमध्ये सुधार करून बँकेच्या योजनेसोबत जोडण्याचे सुचविले. तसेच त्यांनी दिव्यांगांना ई रिक्षा वर स्टॉल लावण्याची अनुमती देण्याची सूचना केली. त्यांनी सांगितले की दिव्यांगांना ई रिक्षा वर स्टॉल लावण्याची परवानगी भेटली तर ते कुठे हि जाऊन आपला व्यवसाय करू शकतील. समाज विकास विभागाचे कामाची प्रशंसा करतांना त्यांनी आई.टी. विभागाचे वेब पोर्टल तयार करण्यासाठी अभिनंदन केले. यावेळी महापौर आणि आयुक्तांच्या हस्ते माहिती तंत्रज्ञान विभागाचे स्वप्नील लोखंडे व त्यांच्या चमूंचा सत्कार करण्यात आला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले, दिव्यांग बांधवांच्या उत्थानाकरिता शासनाच्या विविध योजना आहेत. शिवाय महानगरपालिकाही काही योजना राबविते. मात्र, अनेकांना याचा लाभ मिळत नाही. ऑनलाईन नोंदणीच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक दिव्यांगाने नोंदणी करावी, जेणे करून योजनांचा लाभ घेताना स्पर्धा लागायला हवी. अधिकाधिक नोंदणी करण्यासाठी नगरसेवकांची मदत घेतल्यास त्याचा लाभ अधिक होईल. एकदा नोंदणी केल्यास सर्वच योजनांसाठी ही नोंदणी लागू राहील. हा उपक्रम राबविण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे यांच्या नेतृत्वात अल्पावधीत नोंदणीसाठी पोर्टल तयार केल्याबद्दल मनपाच्या आय.टी.टीमचे यावेळी त्यांनी कौतुक केले.

यानंतर महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि द्रोणाचार्य अर्जुन पुरस्कार विजेते विजय मुनीश्वर यांच्या हस्ते दिव्यांगांसाठीच्या ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विजय मुनीश्वर यांचा महापौर व मनपा आयुक्त यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकातून उपायुक्त राजेश भगत यांनी योजनेच्या माहिती देतांना सांगितले कि समाज कल्याण विभागाच्या लिंक वर क्लीक करून स्वतःचे मोबाइल नंबर टाकून ओटीपी प्राप्त होईल. ओटीपी टाकल्यानंतर अर्जदाराने नोंदणी करावी. पंजीकरण करताना दिव्यांगांचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला , मार्कलिस्ट, रेशन कार्ड, फोटो, मतदान कार्ड संलग्न करावे. संचालन नूतन मोरे यांनी केले. आभार विनय त्रिकोलवार यांनी मानले.

१० दिव्यांगांना इलेक्ट्रिक ट्रायसिकल प्रदान
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह सर्व मान्यवरांच्या हस्ते १० दिव्यांगांना एका योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक ट्रायसिकल प्रदान करण्यात आल्या. अनुदानापोटी प्रत्येकी ४० हजार याप्रमाणे चार लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. लाभार्थ्यांमध्ये शेख बशीर शेख, राधेशाम टाले, श्रावण नागपुरे, प्रशांत भरजिवे, हेमराज बारापात्रे, देविराव निमजे, रमेश गोगलानी, रोशन हजगोडे, विशाल मेश्राम, सचिन भोयटे यांचा समावेश होता. या ट्रायसिकलची निर्मीती राष्ट्रीय स्वाभिमान परिषदेचे मुन्ना महाजन व भगवानदास राठी यांनी केले आहे.

दिव्यांगांनी अशी करावी नोंदणी
नोंदणी करण्याकरिता दिव्यांगांनी नागपूर महानगरपालिकेच्या https://www.nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर ‘समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांग योजनेची नोंदणी’ हे लाल रंगात पॉपअप होत असलेल्या लिंकवर क्लिक करावे. नंतर स्वत:चा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी (वन टाईम पासवर्ड) प्राप्त करावा. प्राप्त झालेला ओटीपी नमूद करून अर्जदाराने पंजीकरण करावे. नोंदणी करताना दिव्यांगाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मार्कशीट, रेशन कार्ड, फोटो, मतदान कार्ड (असल्यास) आदी कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात संलग्न करणे बंधनकारक राहील. ज्या दिव्यांग व्यक्तींना अर्ज करण्यास अडचणी निर्माण होत असेल अशा दिव्यांग व्यक्तीकरिता झोननिहाय समुदाय संघटक यांच्या मदतीने अर्ज करण्याबाबत मदत कक्ष (हेल्प डेस्क) सुरू करण्यात येणार आहे.

या पूर्वीचे सर्व आवेदन रद्द
समाज विकास विभाग तर्फे सांगण्यात आले आहे कि दिव्यांगांनी यापूर्वी केलेले सर्व आवेदन ज्यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही असे सर्व आवेदन रद्द करण्यात आले आहे. आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी ऑनलाईन आवेदन करावे.