Published On : Mon, Jun 7th, 2021

मान्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्या…!

स्थापत्य समिती सभापतींचे निर्देश : मान्सूनपूर्व कामांचा घेतला आढावा

नागपूर : मान्सून लवकरच दाखल होत आहे. हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. संभाव्य अतिवृष्टी लक्षात घेता कुठलीही जीवितहानी होऊ नये, यासाठी दक्ष राहणे आवश्यक आहे. अतिरिक्त आयुक्तांनी यासाठी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व कामांना वेग द्या. कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी तातडीने ही कामे करा, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.

मनपा प्रशासन करीत असलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. ७) ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभापती राजेंद्र सोनकुसरे, समिती सदस्य रुपा राय, वंदना भुरे, आशा उईके, उपायुक्त (अतिक्रमण) महेश मोरोणे, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, मुख्य अभियंता लिना उपाध्याय, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांच्यासह दहाही झोनचे सहायक आयुक्त व संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.


यावेळी बोलताना सभापती राजेंद्र सोनकुसरे म्हणाले, पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टी झाल्यास अनेक सखल वस्त्यांत पाणी साचते. झाडे उन्मळून पडतात. शिकस्त इमारतींना धोका असतो. त्यामुळे पाणी वाहून जावे यासाठी नाल्यांची, चेंबरची सफाई तातडीने पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. ज्या इमारती शिकस्त आहेत, त्यांची यादी तयार करून त्यांची पाहणी करणे अत्यावश्यक आहे. जी झाडे कोसळू शकतात, अशा झाडांसंदर्भात तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. पावसाळ्यात सरपटणारे प्राणी कुठेही निघू शकतात. त्यादृष्टीने शहरातील सर्पमित्रांचे, प्राणीमित्रांचे संपर्क क्रमांक लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. यादृष्टीने तातडीने कार्यवाही करून संपूर्ण कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश सभापती सोनकुसळे यांनी दिले.

शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी ते खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. धोक्याचे पूल, रस्त्यांची डागडुजी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. अनेक ठिकाणी नागनदीवर अतिक्रमण आहे. यासंदर्भात नगरसेवकांच्या आणि नागरिकांच्याही तक्रारी आहेत. यावर अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही सभापतींनी दिले.

प्रत्येक झोन सहायक आयुक्तांनी पावसाळी काळात होऊ शकणारा संभाव्य धोका लक्षात घेता मशिनरी, यंत्रसामुग्री तयार ठेवावी. आपत्ती व्यवस्थापन चमूमध्ये असणाऱ्या सर्वांचे क्रमांक जाहीर करावे. प्रत्येक विभागाने अतिक्रमण विभागाशी आणि आपसात समन्वय ठेवून आपत्ती व्यवस्थापनाचे उत्तम कार्य करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. पावसाळ्यानंतर साथीचे रोग पसरू नये, यादृष्टीने कार्य करायचे आहे. त्यासाठीही तत्पर राहावे, असे निर्देश दिले.