नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून, हे विधान भारतातच नव्हे तर पाकिस्तानातही गाजत आहे. पाकिस्तानातील काही वृत्तवाहिन्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा वापर भारताविरोधात प्रोपगंडा पसरवण्यासाठी केला आहे. या पार्श्वभूमीवर देशात भाजपकडून काँग्रेसवर “शत्रूच्या भाषा” बोलण्याचा आरोप केला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांना “मूर्ख” म्हणत सडकून टीका केली होती. आता या सगळ्या प्रकरणावर स्वतः वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी दिलेले विधान वैयक्तिक नव्हते-
गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मी काल जे बोललो ते माझं मत नव्हतं. मी फक्त एका संरक्षण तज्ज्ञाच्या विश्लेषणाचा संदर्भ दिला होता. पण अनेक माध्यमांनी ती मतं थेट माझ्यावर लादली आणि चर्चेचा विषय बनवला.
नेमकं काय म्हणाले होते वडेट्टीवार?
बुधवारी एका पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांना राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारणा झाली. यावर उत्तर देताना त्यांनी म्हटले होते, “पाकिस्तानकडून 5,000 चीनी ड्रोन भारतात पाठवले गेले. प्रत्येकी किंमत 15,000 रुपये असावी, पण त्यांना पाडण्यासाठी आपण प्रत्येकी 15 लाख रुपयांची क्षेपणास्त्रं वापरली. त्यामुळे अशा प्रकारच्या खर्चाची आणि धोरणांची स्पष्टीकरण सरकारने द्यावी. त्याचबरोबर त्यांनी असंही स्पष्ट केलं होतं की, “युद्धात झालेल्या नुकसानांवर, सैनिकांच्या हौतात्म्यावर सरकारला प्रश्न विचारणे चुकीचे नाही.”
या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया देताना, “मूर्खांना उत्तर दिलं जात नाही,” असं ठणकावून सांगितलं. “ज्यांना लढाऊ ड्रोन आणि शेतीच्या ड्रोनमधील फरक कळत नाही, त्यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही,” असा स्पष्ट टोला फडणवीस यांनी लगावला.
वडेट्टीवार यांचा प्रतिहल्ला –
मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, “जर सरकारला प्रश्न विचारणं देशद्रोह ठरत असेल, तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. चार अतिरेकी कुठे गेले हे विचारल्यावरही देशद्रोही ठरवलं जातं. ही सरकार आता संविधान व न्यायव्यवस्थेपेक्षा मोठी झाली आहे का? वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला राजकीय गोंधळ आणि त्याचा आंतरराष्ट्रीय वापर हे गंभीर बाबी आहेत. आता या विषयावर केंद्र सरकार किंवा काँग्रेस यांची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.