मुंबई – राज्यातील महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात मतदान होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा
या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सरकारने अंमलात आणलेल्या विविध जनहिताच्या योजना आणि प्रकल्पांची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली. यामध्ये रस्त्यांचे मजबुतीकरण, कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाने, आरोग्य सुविधांचा विस्तार, आणि गृहनिर्माण धोरण यांचा समावेश होता. “ही कामे जनतेसमोर प्रभावीपणे मांडणं हे तुमचं कर्तव्य आहे,” असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
नवीन गृहनिर्माण धोरणाचा लाभ मुंबईकरांना मिळणार-
राज्य सरकारच्या नव्या गृहविकास धोरणानुसार अनेक घरांची निर्मिती केली जाणार असून, रखडलेले पुनर्विकास प्रकल्पही गतीने पूर्ण होतील. यामुळे मुंबईबाहेर गेलेले नागरिक पुन्हा मुंबईत स्थायिक होऊ शकतील, असे शिंदे यांनी सांगितले.
जागा वाटपावर मत व्यक्त न करता एकसंघ राहा-
एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, महायुतीतील जागावाटपाचा निर्णय तीन वरिष्ठ नेते मिळून घेतील. त्यामुळे या विषयावर कोणीही उघडपणे मतप्रदर्शन करू नये. युतीतील घटक पक्षांविरोधात कोणतीही टीका अथवा आक्षेपार्ह विधान टाळा, अन्यथा त्याचा परिणाम युतीच्या संबंधांवर होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यकर्त्यांचे मुद्दे ऐकून घेतले-
बैठकीदरम्यान माजी नगरसेवकांनी आपल्या विभागातील समस्यांबाबत माहिती दिली. त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं. “पुढील निवडणूक ही आपली एकत्रित लढाई आहे, त्यामुळे संघभावना आणि संयम आवश्यक आहे,” असं ते म्हणाले.