स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात महापौर, आयुक्तांनी घेतला आढावा
४ ते ३१ जानेवारी दरम्यान सर्वेक्षण
नागपूर: स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९च्या संदर्भात महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी (ता. २६) आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये यासंबंधी आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीला सत्ता पक्ष उपनेते बाल्या बोरकर, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका संगीता गि-हे, अपर आयुक्त राम जोशी, अझीझ शेख, आरोग्य अधिकारी सुनील कांबळे, पशुचिकित्सा अधिकारी गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, महेश मोरोणे, गणेश राठोड, सुवर्णा दखने, स्मिता काळे, जयदेव, कनक रिसोर्सेचे कमलेश शर्मा यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यंदा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नागपूर महानगरपालिकेने तीन स्टार घेण्याचे ध्येय आहे. यासाठी सर्वांचाच सहभाग असणे आवश्यक आहे. यासंबंधी सर्व झोन स्तरावर तयारी केली जावी. प्रत्येक घरातून ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलीत करण्यात यावा. याशिवाय शहरातील मुख्य मार्गांवर कुठेही कच-याचे ढिग दिसू नये यासाठी काळजी घेतली जावी. शहरातील मासोळी व मांस विक्रीच्या बाजारामध्येही स्वच्छता राखली जावी, यासाठी काळजी घेतली जावी, असे यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.
कचरा विलगीकरणाबाबत प्रत्येक झोन स्तरावर जनजागृती करण्यात यावी. यावर पदाधिका-यांसह अधिका-यांची देखरेख असणे आवश्यक आहे. जनजागृतीसंबंधी वार्ड, मोहल्ला सभा घेण्यात याव्यात, असेही निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेने सुरू केलेली जीपीएस वॉच प्रणाली देशासाठी पथदर्शी ठरली आहे. ही प्रणाली मनपामध्ये सुरू राहावी यासाठी योग्य देखरेख करण्यात यावी. जीपीएस घडाळ्याच्या ट्रॅकींगवरूनच सफाई कर्मचा-यांचे वेतन काढण्यात यावे, असेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.
शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. या कॅमेऱ्यांच्या मदतीने कोणत्या भागात कचरा आहे व साफ करण्यात आला अथवा नाही, यावर देखरेख ठेवता येईल. कचरा जाळण्याच्याही तक्रारी अनेकदा येत असतात. शहरातील कोणत्याही भागामध्ये कचरा जाळण्यात आल्यास जाळणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिला.