नागपूर: भारतीय हवामान विभागाने रविवारी (२५ मे) साठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. अरबी समुद्रात एक तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तो अद्याप चक्रीवादळात परिवर्तित झाला नसला, तरी दक्षिण कोकण किनाऱ्यावर या प्रणालीच्या तीव्रतेमुळे राज्यात २८ मेपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शुक्रवारी दक्षिण कोकणपासून थोडं लांब अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात निर्माण झालेला कमी दाबाचा क्षेत्र अधिक तीव्र झाला आहे आणि तो पुढील २४ तासांमध्ये उत्तर दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, उत्तर तेलंगणा आणि दक्षिण छत्तीसगड या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील.
केरळमध्ये मान्सूनचं आगमन; बंगालच्या उपसागरातही हालचाल-
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, मान्सूनने केरळमध्ये अपेक्षेपेक्षा एक दिवस आधी म्हणजेच शनिवारीच प्रवेश केला. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरातही एक द्रोणिका सक्रिय झाली असून मान्सून त्या दिशेने पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात रविवारी मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांचा जोर जाणवण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.