Published On : Thu, May 13th, 2021

क्रिस्टल नर्सिंग होम विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची नोंद

सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा : माजी महापौर संदीप जोशी

नागपूर: रुग्णाच्या उपचारासाठी वारंवार पैशाची मागणी करणे, पैसे न भरल्यामुळे उपचार थांबविणे व परिणामी रुग्णाचा मृत्यू होणे, पाचपावली येथील क्रिस्टल नर्सिंग होमच्या या संतापजनक कृत्याबद्दल रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक दिलीप कडेकर यांचा मुलगा प्रणित कडेकर यांनी गुरुवारी, १३ मे २०२१ रोजी पाचपावली पोलिस स्टेशनमध्ये माजी महापौर संदीप जोशी यांच्या सहकार्याने क्रिस्टल नर्सिंग होमविरोधात गुन्हा नोंद करण्याबाबत पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांच्याकडे तक्रार सादर केली. त्यावर दखल घेत पोलिस प्रशासनाद्वारे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

पैशासाठी रुग्णाचा जीव वेठीस धरणाऱ्या या रुग्णालयाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत माजी महापौर संदीप जोशी यांनी पाचपावली पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहून प्रणित कडेकरच्या लढ्यात सहभाग घेतला. यावेळी संजय चौधरी, किशोर पालांदुरकर, मनपाचे परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नगरसेवक सर्वश्री वीरेंद्र कुकरेजा, विजय झलके, महेंद्र धनविजय संजय चावरे, लखन येरवार, विजय चुटेले, सतीश सिरसवान, जितेंद्र ठाकूर, राजेश हाथिबेड, सुबोध आचार्य, बादल राऊत, पंकज सोनकर, सचिन सावरकर, मानमित पिल्लारे, आलोक पांडे, सचिन करारे, दिपांशू लिंगायत, रितेश गावंडे आदींची उपस्थिती होती.

न्यू सुभेदार लेआऊट येथील रहिवासी प्रणित कडेकर यांनी २१ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे वडील दिलीप कडेकर यांना कोरोनाच्या उपचारासाठी पाचपावली येथील क्रिस्टल नर्सिंग होम येथे दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रणित यांनी रुग्णालय व्यवस्थापनाच्या सांगण्यानुसार २ लाख रुपये डिपॉझिट जमा केले. यानंतर पुढील उपचारासाठी रुग्णालय व्यवस्थापनाकडून वेळोवेळी पैशाची मागणी करण्यात येत होती. बिलाची मागणी केल्यास त्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती. बिलासाठी तगादा लावल्यानंतर रुग्णालय व्यवस्थापनाद्वारे बिल देण्यात आले. मात्र त्यात रक्त चाचण्या, औषधे, इंजेक्शन यामध्ये असलेली प्रचंड शुल्कवाढ निदर्शनास येताच प्रणित कडेकर यांनी माजी महापौर संदीप जोशी यांच्याशी संपर्क साधला.

प्रणित कडेकर यांची तक्रार प्राप्त होताच तातडीने दखल घेत माजी महापौर संदीप जोशी यांनी रुग्णालयात जाऊन तेथील व्यवस्थापनाशी चर्चा केली व वाढीव बिलाबाबत जाब विचारला. याशिवाय संपूर्ण बिलाचे ऑडिट करून देण्याची सूचना केली. यावर रुग्णालय प्रशासनाद्वारे सकारात्मक प्रतिसाद दर्शविण्यात आला, मात्र त्यांनंतरही बिल कमी करण्यात आले नाही. यानंतरही रुग्णालय व्यवस्थापनाचा गलथानपणा सुरूच राहिला. रुग्णाची बायपॅक मशीन काढण्यात आली. रुग्णाच्या परिस्थिती बाबतीतही योग्य माहिती देण्यात आली नाही व पुढे रुग्णाला मृत घोषित करण्यात आले. माजी महापौर संदीप जोशी यांनी रुग्णालय व्यवस्थापनाला ऑडिट केलेले बिल सादर केल्याची सूचना केल्यानंतर अवघ्या एक तासामध्ये रुग्णाला मृत घोषित करण्यात आले. हा संपूर्ण प्रकार संतापजनक असून रुग्णालय व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा व असंवेदनशील वृत्ती यापूर्वी देखील पुढे आली होती.


दोन दिवसांपूर्वी याच क्रिस्टल नर्सिंग होमच्या व्यवस्थान प्रमुख शेख सरीन यांची ‘पैसे दिले नाही रुग्णाचे औषधे बंद करू, अथवा ताबडतोब रुग्णाला डिस्चार्ज करू, अशी धमकीची ऑडिओ क्लिप संपूर्ण शहरातमध्ये गाजली. याशिवाय ५ लाख रुपये भरलेच पाहिजे त्याशिवाय उपचार होणार नाही, अशी डॉ. राजेश सिंघनिया यांची देखील ऑडिओ क्लिप मागील आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. विशेष म्हणजे याच डॉ. राजेश सिंघनियाचे हे हॉस्पिटल आहे. रुग्णालय व येथील व्यवस्थापनाच्या संपूर्ण कारभाराची गंभीर दखल घेऊन याबाबत मनपा प्रशासनाद्वारे कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. याशिवाय पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याची सखोल चौकशी करून यातील दोषींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी माजी महापौर संदीप जोशी यांनी केली आहे.