Published On : Sat, Oct 2nd, 2021

भारतीय स्वातंत्र्याची यशोगाथा भावी पिढीपर्यंत पोहचवा – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी नागपूर स्मार्ट सिटीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागपूर : यंदाचे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी म्हणून साजरा करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याची यशोगाथा प्रेरणादायी आहे. त्यामुळे ही यशोगाथा देशाच्या भावी पिढीपर्यंत पोहचवा, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. तसेच यासाठी आमदार आणि सर्व नगरसेवकांनी आपापल्या क्षेत्रात उपक्रम राबवायला हवेत. तसेच नागपूर स्मार्ट सिटी आणि मनपातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरात अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” समारंभाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता.१) सक्करदरा तलावालगत उद्यानात केले.

याप्रसंगी मंचावर महापौर दयाशंकर तिवारी, आमदार मोहन मते, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, महिला व बाल कल्याण समिती सभापती दिव्या धुरडे, नेहरूनगर झोन समिती सभापती स्नेहल बिहारे, नगरसेविका मंगला गवरे, स्मार्ट सिटीचे डायरेक्टर अनिरुद्ध शेनवई, नगरसेविका रिता मुळे, नगरसेवक नागेश सहारे उपस्थित होते.

महापौर तिवारी यांनी सांगितले की, नागपूर स्मार्ट सिटीतर्फे सक्करदरा आणि बिडीपेठ भागाची नर्चरिंग नेबरहूड (nurturing neighbourhood) म्हणून निवड करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी व मनपाचे नागपूरला नवीन रूप देण्याचे प्रयत्न आहे. या कार्यात नागरिकांचा सहभाग सुद्धा आवश्यक आहे. मनपातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेची देखभाल त्यांना करायची आहे. विरोधी पक्षनेता तानाजी वनवे यांनी सुद्धा याप्रसंगी आपले मत व्यक्त केले. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य व विकासात योगदानाबद्दलच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.

स्मार्ट सिटीतर्फे आयोजित अमृत महोत्सवमध्ये सकाळी जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळतर्फे योग प्रशिक्षक राहुल कानिटकर व त्यांच्या चमूने योग प्रशिक्षण दिले. त्यांच्या या कार्याबद्दल महापौरांनी त्यांना सन्मानित केले. मनपा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे देशभक्तीपर गीतांची प्रस्तुती करण्यात आली.

सायंकाळी महिलांसाठी उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच ‘ईट राईट चॅलेंज’ अंतर्गत आरोग्यासाठी पोषक खाद्यपदार्थांबद्दल माहिती देण्यात आली. ईट राईट चॅलेंजबद्दल माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या धवड आणि चौधरी यांनी दिली.

मनपा अग्निशमन विभागाच्या पथकाचे सादरीकरणही यावेळी झाले. स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंज अंतर्गत प्रथम पुरस्कार श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांना मिळाले. यांच्यातर्फे प्रा. प्रिया चौधरी आणि तनवी बुरघाटे यांना स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. सुभेदार आखाड्यातील मुलांनी आत्मसुरक्षेचे धडे देऊन संपूर्ण चमूने आत्मसुरक्षा करण्याचे विविध प्रकार सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले. यावेळी स्मार्ट सिटीच्या कंपनी सचिव भानुप्रिया ठाकूर, वित्त अधिकारी नेहा झा तसेच राजेश दुफारे, डॉ प्रणिता उमरेडकर, मनजीत नेवारे, गुड्डी उजवणे, डॉ. शील घुले, राहुल पांडे आदी उपस्थित होते.

स्केटिंग रॅलीचे आयोजन
नागपूर स्मार्ट सिटी आणि मनपा तर्फे “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत आयोजित स्केटिंग रॅली रोहित देशपांडे आणि लाल सिंग यांच्या सौजन्याने संविधान चौकात काढण्यात आली. यावेळी लहान मुलांनी ७५ मिनिटं स्केटिंग केली.

आज बर्डी येथे कार्यक्रम
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरला सकाळी व्हेरॉयटी चौक येथून रॅली काढण्यात येईल. रॅलीमध्ये गांधीजींच्या वेशभूषेमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचा सहभाग असेल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ग्लोकल मॉलपर्यंत ही रॅली काढण्यात येईल. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना प्लास्टिकचा वापर बंद करा, तंबाखूचे सेवन करू नका, पर्यावरणाचे रक्षण करा आदी संदेश देण्यात येतील. या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, महापौर दयाशंकर तिवारी व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहिल. कार्यक्रमात जेसीज रॉयल, लॉयन्स क्लब आदी संघटनांचे सहकार्य असणार आहे.