Published On : Sat, Oct 2nd, 2021

नेहरू युवा केंद्राद्वारे नागपुरात क्लीन इंडिया मोहिमेला सुरुवात;

जिल्हाधिकारी स्वच्छता अभियानात सहभागी

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नागपूर येथील नेहरू युवा केंद्रामार्फत क्लीन इंडिया मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत जिल्हा प्रशासनही हिरीरीने सहभागी झाले असून जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नेहरू युवा केंद्राने क्लीन इंडिया मोहिमेचे प्रतिनिधित्व केले आहे. यासाठी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या मार्गदर्शनात बैठक झाली होती. त्यानंतर नेहरू युवा केंद्रामार्फत अमृत महोत्सव इंडिया ॲट सेव्हन्टी फाईव्ह उपक्रमात आज क्लीन इंडिया मोहिमेच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या उपस्थितीत नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयविर व अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

प्रकाशन सोहळ्यानंतर क्लीन इंडिया मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी परिसरातून करण्यात आली. जिल्हाधिकारी विमला आर व उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी स्वतः स्वयंसेवक बनत परिसरातील स्वच्छता मोहिमेत स्वतःचा सहभाग नोंदविला.

यावेळी त्यांनी उपस्थित सर्व नागरिकांना व कर्मचाऱ्यांना देखील क्लिन इंडिया मोहिमेत सहभागी होऊन आपापली कार्यालय स्वच्छ व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान केले. ही मोहीम जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये राबविली जाणार आहे. तसेच सार्वजनिक उपक्रमाअंतर्गत असणाऱ्या विविध संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत ही मोहीम राबविली जावी, असे आवाहन नेहरू युवा केंद्राने केले आहे.