Published On : Sat, Oct 2nd, 2021

मनपातर्फे ‘वेस्ट इंटरप्रेन्योर सत्कार व कचरा कला प्रदर्शनीचे आयोजन’

Advertisement

चंद्रपूर : आझादी का अमृत महोत्सव व स्वच्छ भारत अभियानांतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे मुख्य प्रशासकीय इमारतीत ‘वेस्ट इंटरप्रेन्योर सत्कार व कचरा कला प्रदर्शनीचे’ आयोजन करण्यात आले. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उदघाटन झाले. यावेळी प्रामुख्याने मनपायुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, झोन १ च्या सभापती छबूताई वैरागडे उपस्थित होत्या. प्रदर्शनीत मांडलेल्या टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या कलाकृतींची माहिती महापौर आणि आयुक्तांनी जाणून घेतली.

चंद्रपूर शहर महानगरपालिका “आजादी का अमृत महोत्सव” मोहिमेअंतर्गत दिनांक १० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत बेस्ट इनोव्हेटिव्ह आयडिया फ्रॉम वेस्ट (कचर्‍यापासून नाविन्यपूर्ण संकल्पना) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रमात सहभागी रक्षण धरणी मातेचे संस्था, डॉ. बी. डी. पालीवाल, सेंट्रल इन्स्टिटयूट ऑफ प्लास्टिक इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी (सिपेट) चे संचालक आणि प्रमुख अवनीत कुमार जोशी, अनिल वारूलवार – रॅग पिकर, सुवर्णा विजय लोखंडे यांना महापौर व आयुक्तांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती.