कर आकारणी समिती सभापती महेंद्र धनविजय यांचे निर्देश
नागपूर : चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ दोन महिने शिल्लक आहे. मागील वर्षीपेक्षा मालमत्ता कर वसुली चांगली असली तरी समाधानकारक नाही. पुढील दोन-महिन्यात घरोघरी भेट द्या आणि करवसुलीचे उद्दिष्ट गाठा, असे निर्देश कर व आकारणी समितीचे सभापती महेंद्र धनविजय यांनी दिले.
नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात मंगळवारी (ता. २१) करवसुलीसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभापती महेंद्र धनविजय यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीला उपसभापती सुनील अग्रवाल, समिती सदस्य उज्ज्वला शर्मा, शिल्पा धोटे, स्नेहा निकोसे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, कर अधीक्षक गौतम पाटील, कर संग्राहक श्री. उमरेडकर सहायक आयुक्त राजू भिवगडे, किरण बगडे, गणेश राठोड, हरिश राऊत, प्रकाश वऱ्हाडे, स्नेहा करपे, सुभाष जयदेव यांच्यासह सर्व झोनचे कर सहायक अधीक्षक उपस्थित होते.
सभापती महेंद्र धनविजय यांनी कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी यापुढे सुट्याचे दिवसही काम करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, कर वसुलीमध्ये सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा उपयोग करून घ्या. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांची मदत घ्या. वॉर्डावॉर्डात शिबिरांचे आयोजन करा. जप्ती करण्यात येत असलेल्या मालमत्तांची माहिती लोकांसमोर येऊ द्या. यापुढे कर चुकवेगिरी करणाऱ्या कुणाचीही गय करू नका. नियमानुसार कडक कारवाई करा, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
तत्पूर्वी सभापती महेंद्र धनविजय आणि समिती सदस्यांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आकारणीचा झोननिहाय आढावा घेतला. मालमत्ता कर मागणी देयके तामील करणे, एप्रिल २०१९ ते आजपर्यंतची वसुली, हुकूमनामा, लिलाव व जप्ती बाबतची सद्यपरिस्थिती आणि १०लाखांपर्यंतच्या आणि त्यावरील बकाया धारकांची संख्या व वसुलीबाबतची संपूर्ण माहिती झोनच्या सहायक आयुक्तांनी दिली. कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी काय-काय उपाययोजना सुरू आहेत, काय उपक्रम राबविले जात आहे, याबाबतचीही माहिती सहायक आयुक्तांनी दिली.
नगरसेवक महेंद्र धनविजय सभापती झाल्यानंतर मंगळवारची बैठक पहिलीच असल्याने कर विभागाच्या वतीने तुळशीचे रोपटे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. समितीतील अन्य सदस्यांचाही यावेळी तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
सोमवारपासून झोननिहाय बैठक
सोमवार २७ जानेवारीपासून कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी झोननिहाय बैठका घेणार असल्याची माहिती सभापती महेंद्र धनविजय यांनी दिली. झोनमधील बैठकांमध्ये प्रभागनिहाय, वॉर्डनिहाय माहिती घेणार असून त्यादृष्टीने संबंधित कर निरीक्षकाला माहिती तयार ठेवण्याचे निर्देश द्यावे, असेही त्यांनी सहायक आयुक्तांना सांगितले. कर्तव्यात जे हयगय करीत असतील, त्यांच्यावर नियमानुसार प्रशासनिक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.