Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Apr 23rd, 2020

  प्रत्येक गरजवंतांपर्यंत मदत पोहोचवा, त्यांना सहकार्य करा!

  महापौर संदीप जोशी यांनी केली व्यवस्थेची पाहणी : कर्मचाऱ्यांना दिले प्रोत्साहन

  नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता धान्य आणि भोजनाची मागणी वाढली आहे. पदाधिकारी आणि नगरसेवकांपर्यंत ही मागणी येत आहे. महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षालाही अनेक गरजू व्यक्ती संपर्क साधत आहे. ज्यांची-ज्यांची मागणी येईल, अशा प्रत्येक गरजवंतांपर्यंत मदत पोहोचवा. त्यांना संकटकाळात पूर्णपणे सहकार्य करा. कुणीही उपाशी राहायला नको, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.

  नागपूर महानगरपालिकेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी करण्यात आलेल्या संपूर्ण व्यवस्थेची पाहणी गुरुवारी (ता. २३) महापौर संदीप जोशी यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, भोजन व्यवस्थेचे नोडल अधिकारी तथा उपायुक्त मिलिंद मेश्राम, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, नोडल अधिकारी अभिजीत राऊत उपस्थित होते.

  सर्वप्रथम त्यांनी नागपूर महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतीमधील नियंत्रण कक्षाला भेट दिली. नियंत्रण कक्षात दररोज किती नागरिक संपर्क साधतात, त्यांना आपण काय माहिती देतो, बहुतांश चौकशी कशासंदर्भात असतात, आपण त्यांचे समाधान कशा प्रकारे करतो, याबाबत संपूर्ण माहिती महापौर संदीप जोशी यांनी जाणून घेतली. नोडल अधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली. दिव्यांग आणि निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक असून त्यांना विशेषत्वाने दोन वेळचे भोजन व अन्य मदतही पोहचविण्यात येत असल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. १५ दिवसात १२५० लोकांची नोंदणी नियंत्रण कक्षात झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

  दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचे दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून जे कॉल येतात, ती मागणी आमच्याकडे द्या. दीनदयाल फाऊंडेशनच्या माध्यमातून आवश्यक त्या वस्तू, भोजन पुरविण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले.

  फूड झोनला भेट
  यानंतर महापौर संदीप जोशी यांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नागपूर महानगरपालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या भोजन व्यवस्थेची पाहणी केली. मनपा मुख्यालयात महिला कर्मचाऱ्यांतर्फे फूड पॅकिंग करण्यात येते. स्वामीनारायण मंदिर ट्रस्टतर्फे दररोज तीन हजार आणि मैत्री परिवारातर्फे एक हजार पोळ्या येतात तर रतन कॉम्प्लेक्स सोसायटीकडून भाजी येते. यातून दररोज १५०० फूड पॅकेटस्‌ तयार केले जातात. भांडेवाडी व अन्य भागातील गरजूंना नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे फूड पॅकेटस्‌ पुरविले जातात, अशी माहिती उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम यांनी दिली.

  नागपूर महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षासह अन्य माध्यमातून जे-जे गरजवंत मदतीची मागणी करतात, त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत मदत पोहचवा. कर्मचारी करीत असलेले काम उत्तम असून दैनंदिन कार्याव्यतिरिक्त मदत कार्यात करीत असलेले सहकार्य वाखाणण्याजोगे आहे, असे म्हणत त्यांनी नियंत्रण कक्षातील कर्मचारी आणि फूड झोनमधील महिला कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले.

  यानंतर महापौर संदीप जोशी यांनी महापौर कक्षात उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त अमोल चौरपगार आणि अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्याशी कोरोना उपाययोजनासंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली आणि आवश्यक ते निर्देश दिले.

  मदतीकरिता करा नियंत्रण कक्षात फोन
  कोव्हिडदरम्यान नागरिकांना कुठलीही मदत हवी असेल, शंकांचे निरसन करावयाचे असेल त्यासाठी मनपात नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिका नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२१, ०७१२-२५६२४७४, ०७१२-२५६१८६६ असा असून या क्रमांकावर फोन करता येईल.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145