Published On : Sat, Jul 27th, 2019

कर वसुलीचे सहामाहीचे उद्दिष्ट निवडणुकीपूर्वी गाठा

सभापती संदीप जाधव : कर आकारणी व कर संकलन समितीची बैठक

नागपूर : निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पहिल्या तिमाहीतील मालमत्ता कर वसुली प्रभावित झाली होती. पुढे पुन्हा विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे कर वसुलीचे सहामाहीचे उद्दिष्ट निवडणुकीपूर्वी पूर्ण करा, असे निर्देश कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती संदीप जाधव यांनी दिले.

कर आकारणी व कर संकलन समितीची पहिली बैठक शुक्रवारी (ता. २६) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्य महेंद्र धनविजय, उज्ज्वला शर्मा, शिल्पा धोटे, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, कर अधीक्षक गौतम पाटील, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, राजू भिवगडे, सुभाष जयदेव, हरिश राऊत उपस्थित होते.

पुढे बोलताना सभापती संदीप जाधव म्हणाले, चालू वर्षात निवडणुका आल्याने कर वसुलीवर त्याचा परिणाम नक्कीच पडला आहे. मात्र, निवडणुकीव्यतिरिक्त काळात कर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यतत्पर राहून वसुलीचे उद्दिष्ट गाठायला हवे. मागील वर्षीसारख्या बिलाच्या अडचणी यावर्षी नक्कीच नाही. त्यामुळे प्राप्त बिल तातडीने नागरिकांपर्यंत पोहचविण्यात यावे. पुढील बैठकीपर्यंत १०० टक्के बिलाचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

ज्या मालमत्तांचा कर गेल्या काही वर्षांपासून थकीत आहे, त्या मालमत्तांचा लिलाव करण्याच्या सूचनाही सभापती संदीप जाधव यांनी दिल्या. पुढील महिन्यात झोननिहाय बैठका घेऊन कर वसुलीचा सविस्तर आढावा घेण्यात येईल. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तत्पूर्वी सभापती संदीप जाधव यांनी कर वसुलीचा झोननिहाय आढावा घेतला. मागील वर्षीची आणि यावर्षीची जुलै महिन्यातील कर वसुलीची आकडेवारी त्यांनी घेतली. यावर्षी करवसुली अधिक प्रभावीपणे करण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी झोन अधिकाऱ्यांकडून सूचना मागविल्या. सकारात्मक मानसिकतेतून काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी समितीच्या अन्य सदस्यांनीही कर वसुलीसंदर्भात काही सूचना केल्या. सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम यांनीही करवसुली उद्दिष्टासंदर्भात माहिती दिली. उपायुक्त राजेश मोहिते यांनी प्रत्येक आठवड्याला कर वसुलीचा आढावा घेण्यात येतो, असे सांगत कर्मचाऱ्यांनी आता कामाचा वेग वाढविण्याचे आवाहन केले.

बैठकीला झोनमधील कर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.