Published On : Sat, Jul 27th, 2019

‘मेअर इनोव्हेशन कौंसिल’च्या कार्यालयाचे उद्घाटन


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने युवा संशोधकांच्या नव संकल्पनांना व्यासपीठ देण्याच्या ऑगस्ट महिन्यात ‘इनोव्हेशन पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने ‘मेअर इनोव्हेशन कौंसिल’च्या कार्यालयाचे शुक्रवारी (ता.२६) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीत तळमजल्यावर ‘मेअर इनोव्हेशन कौंसिल’चे कार्यालय आहे.

कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे कन्वेनर डॉ. प्रशांत कडू, इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर, नवनियुक्त सहायक आयुक्त स्नेहल करपे, किरण बगडे, मनोज रंगारी, मुकुंद पात्रिकर आदी उपस्थित होते.

येत्या २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान मानकापूर स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स येथे ‘इनोव्हेशन पर्व’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘इनोव्हेशन पर्व’मध्ये सहभागी होणा-या तरुणांना आवश्यक ती माहिती ‘मेअर इनोव्हेशन कौंसिल’च्या कार्यालयातून मिळणार आहे. याशिवाय ‘इनोव्हेशन पर्व’बाबत आवश्यक ती सर्व तयारी कार्यालयाच्या माध्यमातूनच केली जाणार आहे.

आपल्या शहराच्या विकास प्रक्रियेमध्ये आपल्या नवसंकल्पनांचा अंतर्भाव व्हावा व त्यातून सर्वसामान्यांच्या जीवनात सुलभता निर्माण व्हावी यासाठी तरुणांनी ‘इनोव्‍हेशन पर्व’मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यानिमित्ताने केले.