
नागपूर – देशभरात मोठी खळबळ उडवणाऱ्या NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर अखेर National Testing Agency (NTA) ने पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली NEET UG 2026 परीक्षा आता 21 जून 2026 रोजी घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
3 मे रोजी पार पडलेल्या NEET परीक्षेनंतर राजस्थानातील सीकर येथे ‘गेस पेपर’ व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला होता. या गेस पेपरमधील अनेक प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. विशेषतः रसायनशास्त्र विषयातील अनेक प्रश्न जसाच्या तसे आढळल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. वर्षभर मेहनत घेऊन परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच NTA ने अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुनर्परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
NTA ने स्पष्ट केले आहे की विद्यार्थ्यांना पुन्हा Registration करण्याची गरज नाही. आधी जमा केलेली माहितीच पुढील प्रक्रियेसाठी वापरली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा फी वैध राहणार असून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. नवीन परीक्षेनुसार विद्यार्थ्यांना पुन्हा एडमिट कार्ड जारी करण्यात येणार असून ते अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जातील.
दरम्यान, परीक्षा केंद्रांमध्ये काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी विद्यार्थ्यांनी पूर्वी दिलेले केंद्र पर्याय कायम ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. NEET पुनर्परीक्षेच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन आणि पुढील प्रवेश प्रक्रिया प्रभावित होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.








