Published On : Sat, Mar 14th, 2020

संशयित रुग्णांचे घरीच विलगीकरण – रवींद्र ठाकरे

Advertisement

तीन रुग्ण रुग्णालयात दाखल ; चौथाही परततोय

नागपूर : रुग्णालयात दाखल होऊन परत गेलेल्या संशयित रुग्णांशी संपर्क झाला असून, त्यापैकी तिघेजण रुग्णालयात परतले आहेत. त्यापैकी ऊर्वरीत एकजण परत येत असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. बचत भवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.

नागपुरातील मेयो रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले हे 4 संशयित शासकीय मेयो रुग्णालयात दाखल होते. या चारही संशयितांचा अहवाल आज शनिवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत येणार होता. त्यापूर्वीच हे चारही जण काल मध्यरात्री रुग्णालयातून घरी परत गेले होते. तिघांपैकी एकाच्या लहान मुलीला ताप होता. त्यामुळे तो रुग्णालयात थांबू शकत नव्हता, असे जिल्हाधिकारी श्री. ठाकरे यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांवर नागपुरातील मेयो व मेडीकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पॉझिटिव्ह व संशयित रुग्णांत वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आलेले आहे. त्यांना रुग्णालयात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सोयी पुरविण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.

पोलिस यंत्रणेची मदत घेणार

मेयो आणि मेडीकलमध्ये कोरोना पॉझिटीव्ह आणि संशयित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल रात्रीसारखा प्रकार पुन्हा घडू नये, याची जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पूर्ण खबरदारी घेत आहे. रात्री घरी परत जाणाऱ्या संशयित रुग्णांना डॉक्टर व परिचारिकांनी थांबण्याची विनंती केली. मात्र रुग्ण घरी निघून गेले. जिल्हा प्रशासनाला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे आता पोलिस तैनात करणार असल्याचे सांगून, पोलिस यंत्रणेचीही मदत घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.