Published On : Mon, Nov 4th, 2019

संत्रा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा तयार-रविंद्र ठाकरे

नागपूर : विदर्भातील संत्रा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी क्लस्टर धोरण जाहीर करण्यात आले आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण संत्र्यांचे उत्पादन घेवून जागतिक बाजारपेठेतील मागणीनुसार संत्रा फळाला प्रोत्साहन देण्यात येत असून या धोरणांतर्गत जिल्ह्यातील संत्रा उत्पादक भागीदारांना या क्लस्टरमध्ये सहभागी करुन घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

वनामती येथे नागपुरी संत्रा निर्यातीसाठी निश्चित धोरण ठरविण्यासोबतच क्लस्टरच्या अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. ठाकरे बोलत होते.

यावेळी संत्रा निर्यात क्लस्टर धोरणाचे नोडल अधिकारी तसेच अपेडाचे सहाय्यक महाप्रबंधक प्रशांत वाघमारे, पीसीआरआयचे संचालक डॉ. एम. एस. लढानिया, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक गजेंद्र भारती, महाऑरेंजचे संचालक श्रीधर ठाकरे, नागपूर व अमरावतीचे कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधिकारी, संत्रा उत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

विदर्भातील संत्रा या पिकाखाली साधारणत: 1 लाख 3 हजार 761 हेक्टर क्षेत्र असून यापैकी नागपूर जिल्ह्यात 19 हजार 976 हेक्टर क्षेत्रात संत्रा फळाचे उत्पादन घेतल्या जाते. केंद्र शासनाने नागपुरी संत्रा निर्यातीकरिता धोरण जाहीर केले असून यांतर्गत 2022 पर्यंत कृषी निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष गाठताना संत्र्याच्या निर्यातीलाही प्रोत्साहन देण्याचे धोरण तयार केले आहे. यासाठी संत्रा उत्पादनाच्या दृष्टीने क्लस्टर तयार करुन या क्लस्टरमध्ये गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी स्टेक होल्डर (भागीदारांना) सहभागी करुन घेण्यात येत आहे.

संत्रा या फळाचे विविध शेतकरी उत्पादक गटाकडून निर्यात करण्यात येत होती. संत्रा निर्यातीमध्ये येणाऱ्या अडचणी तसेच क्लस्टरमधील सर्व शेतकऱ्यांना निर्यातीच्या दृष्टीने क्षमता बांधणी करुन त्यांना केंद्रीय लिंबूवर्गीय अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन संत्रा उत्पादन करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार असून निर्यातक्षम गुणवत्तापूर्ण संत्रा उत्पादन करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.

संत्रा निर्यातीसंदर्भात केंद्र व राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन देण्यात येत असून यासंदर्भात असलेल्या योजनांची माहिती नोडल अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी दिली. संत्रा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी यांची समिती तयार करण्यात येवून ही समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राहणार आहे. संत्रा निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने सिट्रसनेट या प्रणालीवर क्लस्टरमधील शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येईल. या क्लस्टरमधील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात येईल.

श्रीलंका, बांग्लादेश तसेच मध्य आशियातील विविध देशांमध्ये नागपुरी संत्र्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु ग्राहकांच्या मागणीनुसार दर्जेदार संत्रा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. आखाती व युरोपीय देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाव असल्यामुळे निर्यातीला अपेडामार्फत प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी पॅक हाऊसची निर्मिती सुद्धा करण्यात आली आहे. पीसीआरआय या संस्थेमार्फत संत्र्याच्या काढणीपूर्व व काढणीनंतरचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून हे तंत्रज्ञान संस्थेमार्फत शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यात येत असल्याची माहिती यावेळी संस्थेचे संचालक डाँ. लढानिया यांनी दिली.

प्रारंभी वनामतीच्या अपर संचालक डॉ. अर्चना कडू व उपसंचालक मिलिंद मुऱ्हेकर यांनी संत्रा उत्पादक परिषदेच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली.