Published On : Mon, Nov 4th, 2019

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन तात्काळ अहवाल शासनास पाठवा

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

नागपूर‍ : जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिवसभरात केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी त्यांच्यासोबत आशिष जयस्वाल, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मिलींद शेंडे, रामटेकचे तहसीलदार श्री. मस्के, तालुका कृषी अधिकारी वासनिक, तलाठी आडे, प्रशांत सांगळे, तहसिलदार सहारे उपस्थित होते. मौदा तालुक्यातील लापका, रामटेक तालुक्यातील शिवनी आणि पारशिवनी तालुक्यातील निलज येथील पाहणी केली. अती वृष्टी झालेल्या शेतशिवाराची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकत्यांशी संवाद साधला. तसेच तलाठी, कृषीसेवक, कृषी विभाग, तालुका प्रशासनास लवकरात लवकर पिक नुकसानीचे पंचनामे तयार करून शासनास अहवाल सादर करावा, असे ते म्हणाले.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे उद्ध्वस्त झाले असतानाच पिकाच्या नुकसानीचे सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

पालकमंत्री बावनकुळे यांनी आज मौदा, रामटेक आणि पारशिवनी या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या हानीची पाहणी केली. मौदा, रामटेक तालुक्यात प्रामुख्याने धान पिकाची प्रचंड हानी झाली आहे. पावसासह जोरात वारा असल्यामुळे धानाचे पीक झोपले. आता हे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागत नाही. यावेळी पालकमंत्री यांनी सप्टेंबरमध्ये पावसामुळे सुमारे 25 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले तर ऑक्टोबरमधील अतिपावसामुळे अंदाजे 5500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे निर्देश सर्व पालकमंत्र्यांना दिले आहेत. त्यानुसार पाहणी करून कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, संत्रा, मोसंबी, भाजीपाला, फळपिकांचेही नुकसान झाले असून या सर्व ठिकाणची पाहणी केली जाणार आहे. गावात जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना मदतीसाठी धीर देत आहोत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चितपणे दिली जाणार आहे. नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी योजना तयार करण्यात आली आहे, असेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीचे सर्वेक्षण 3-4 दिवसात करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल पाठवू. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे सुरु झाले आहेत. या सोबतच कर्ज कुणी घेतले, पीक विमा कुणी काढला याची माहितीही कृषी विभागाचे अधिकारी घेत आहेत, असेही जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.