
मुंबई : अखेर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हाती देण्यात आली आहे. आज मुंबईतील वरळी डोम येथे पार पडलेल्या एका भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री आणि निवडीनिरीक्षक किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत ही निवड औपचारिकपणे जाहीर झाली.
यापूर्वी प्रदेश कार्याध्यक्ष पद सांभाळणारे चव्हाण यांनी आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अधिकृतपणे सूत्रे स्वीकारली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते अध्यक्ष बावनकुळे, खासदार आशिष शेलार, विनोद तावडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते. कार्यक्रमाला मिळालेली प्रचंड गर्दी ही आतापर्यंतची विक्रमी मानली जात आहे. सर्व आसनं भरल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना उभे राहून कार्यक्रम पाहावा लागला.
डोंबिवलीचे आमदार असलेले रविंद्र चव्हाण हे भाजपमध्ये दीर्घकाळपासून सक्रिय असून, त्यांनी नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, मंत्री आणि प्रदेश सरचिटणीस अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पृष्ठभूमीतून येणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची ओळख आहे.
राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने काहीसे नाराज असल्याचे बोलले जात असतानाच, पक्षश्रेष्ठींनी त्यांना दिलेले प्रदेशाध्यक्षपदाचे आश्वासन अखेर पूर्ण झाले आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्य भाजपला नवे संघटनात्मक नेतृत्व लाभले असून, विशेषतः कोकणासह इतर भागांत पक्षविस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची महसूल मंत्री म्हणून झालेली नियुक्ती आणि त्यानंतर रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. जानेवारी २०२५ पासून ते प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे भाजपमध्ये नवीन ऊर्जा आणि दिशा निर्माण होईल, अशी पक्षाच्या वर्तुळात आशा व्यक्त केली जात आहे.