Published On : Sun, Apr 29th, 2018

महाराष्ट्र दिन समारंभाची शिवाजी पार्क येथे रंगीत तालिम

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त येत्या १ मे रोजी दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या राष्ट्रध्वजवंदन संचलन समारंभाची आज रंगीत तालिम करण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभाग, पोलीस दल यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनी होणाऱ्या संचलनाचा यावेळी विविध पथकांनी सराव केला. प्रजासत्ताक दिनी संचलन केलेल्या उत्कृष्ट पथकांना यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यात राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. 8 व 11, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल (पुरुष) यांनी शासकीय गटातील अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. तर शालेय पथकात भारत स्काऊट आणि गाईडस् (मुली) प्रथम तर भारत स्काऊट आणि गाईडस्‌ (मुले) यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.