Published On : Sun, Apr 29th, 2018

नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झिरो पेंडन्सी उपक्रम राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

strong>नागपूर : महानगरपालिकेतील नागरी सुविधांची कामे विकेंद्रित पद्धतीने होण्यासाठी झोन कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असून नागरिकांची कामे जलद पद्धतीने होण्यासोबतच जलद कार्यपद्धतीसाठी झिरो पेंडन्सी उपक्रम राबवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या नवनिर्मित सतरंजीपुरा झोन कार्यालयाचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, गिरी व्यास, कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, नागरिकांची कामे जलदगतीने होण्यासाठी महापालिकेने झोन निर्मितीचा निर्णय घेतला. यामध्ये सतरंजीपुरा झोन निर्माण व्हावा, यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. झोन निर्मितीसोबतच सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने झिरो पेंडन्सी उपक्रम हाती घेतला आहे. यात सुमारे एक कोटीहून अधिक फाईल निकाली काढण्यात आल्या आहे. दररोजचे काम दररोज होण्यासाठी महापालिकेतही झिरो पेंडन्सी उपक्रम राबविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

सतरंजीपुरा झोनच्या सभापती प्रा. यशश्री नंदनवार यांनी प्रास्ताविक केले. सुरवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि मान्यवरांनी फीत कापून इमारतीचे उद्घाटन केले. इमारतीची पाहणी केल्यानंतर मान्यवरांनी कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विठू महाजन, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, संजय मेडपल्लीवार यांचा सत्कार करण्यात आला.