मुंबई: कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिवसेनेच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राणे हे सध्या भाजप आघाडीचे घटक असूनही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथे झालेल्या एका संयुक्त मेळाव्यात व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे आणि उमेदवार अनिकेत तटकरे या पितापुत्रांसह नितेश राणेदेखील उपस्थित होते. या मेळाव्यात नितेश राणेंनी अनिकेत तटकरे यांना महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव भाजपने दिला होता.
त्याबाबत काही दिवसांपूर्वी नारायण राणेंना कोकणातील निवडणुकीबाबत विचारले असता, आम्ही या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचा उमेदवार देणार नाही, मात्र शिवसेनेलाही जिंकू देणार नाही, असे सांगत तटकरेंच्या पाठिंब्याचे संकेत दिले होते. बुधवारी खासदार नारायण राणे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक कणकवली येथे बोलावली होती. या बैठकीनंतर त्यांनी अनिकेत तटकरे यांच्या पाठिंब्याची घोषणा केल्याचे समजते.
सिंधुदुर्गमधील मतदानाचा हाेणार तटकरेंना फायदा
सुनील तटकरे यांनी स्वाभिमान पक्षाच्या पाठिंबा मिळाल्याबद्दल राणेंचे आभार मानत त्यांच्या पाठिंब्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही विधान परिषदेच्या निवडणुकीत राणेंच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मदत मिळाली होती. मात्र त्या वेळी राणे हे आघाडीचे अधिकृत सदस्य नव्हते. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ हा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा तीन जिल्ह्यांचा असून रायगडात तटकरेंची तर रत्नागिरीत शिवसेनेची ताकद आहे. तर सिंधुदुर्गात नारायण राणे आणि शिवसेना यांची समसमान ताकद असली तरीही राणेंचा या जिल्ह्यातील राजकारणावर प्रभाव आहे. त्यामुळे राणेंच्या पाठिंब्याने तटकरेंचे पारडे जड झाल्याचे दिसते.
