Published On : Thu, Oct 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

चॉकलेट आणि १० रुपयांचे आमिष; दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी ५५ वर्षीय आरोपीला अटक

Advertisement

Auto Draft

नागपूर रामटेक : चॉकलेट आणि प्रत्येकी दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून दोन नऊ वर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप रामटेक तालुक्यातील बोरडा (सराखा) येथील एका ५५ वर्षीय व्यक्तीवर करण्यात आला आहे. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपी जयदेव तुकाराम वासनिक याच्याविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांसोबत घडलेल्या या कथित घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानाजवळ नेल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पीडित मुली नऊ वर्षांच्या असून त्या तिसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीदरम्यान दोन्ही मुली चॉकलेट घेण्यासाठी गावातील संबंधित दुकानात गेल्या होत्या. यावेळी आरोपीने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून त्यांना दुकानाच्या बाजूला नेले आणि दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, प्रत्येकीला दहा रुपये देऊन घडलेल्या प्रकाराबाबत घरी कोणालाही सांगू नका, असे आरोपीने सांगितल्याचेही तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे.

Advertisement

घरी परतल्यानंतर मुलींनी सांगितला प्रकार

सायंकाळी मुलींच्या आई घरी परतल्यानंतर पीडित मुलींनी घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी संबंधित व्यक्तीकडे विचारणा केली. सुरुवातीला आरोपीने मुलींना चॉकलेट आणि पैसे देऊन परत पाठवल्याचे सांगितल्याची माहिती आहे.

दरम्यान, दुसऱ्या पीडित मुलीनेही घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर संपूर्ण प्रकरण समोर आले. यानंतर दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी रामटेक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पॉक्सोअंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रामटेक पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ मधील कलम ६४(२), ६४(२)(i), ६४(२)(m) आणि ६५(२), तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पॉक्सो), २०१२ मधील कलम ४ आणि ६ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

दोन्ही पीडित मुलींच्या तक्रारींच्या अनुषंगाने दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत.

दोन चिमुकल्यांसोबत घडल्याचा आरोप असलेल्या या गंभीर घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रकरणाचा सखोल तपास करून पीडित मुलींना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.