
नागपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागपूर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईचा धडाका लावला आहे. परिमंडळ क्रमांक ५ अंतर्गत २०९ संशयित व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
यशोधरानगर, कळमणा, पारडी, वाठोडा आणि भांडेवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले तसेच अवैध दारूविक्री करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
पोलीस ठाणेनिहाय पाहता यशोधरानगर येथील ६०, कळमणा ६०, पारडी ३५, वाठोडा २२ आणि भांडेवाडी येथील ३२ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण २०९ जणांवर आदेश जारी करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधितांना १३ ते २६ सप्टेंबरदरम्यान पाच दिवसांसाठी परिमंडळ क्रमांक ५ अंतर्गत संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच आदेशाच्या कालावधीत संबंधित कार्यक्षेत्रात प्रवेश न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून संवेदनशील व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्रमांक ५ चे पोलीस उप आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी नित्यानंद झा यांनी केली.




