नागपूर : रामटेक तालुक्यातील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचा काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इनोव्हा कार चालक वैभव मिश्रा यांचाही सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
२३ ऑगस्टच्या सकाळी साडेसहाच्या सुमारास डॉ. त्रिपाठी आपल्या पत्नी व चालकासह मऊ–कुशीनगर महामार्गावरून मूळगाव देवरिया येथे जात होते. प्रवासादरम्यान त्यांची काळ्या रंगाची इनोव्हा कार महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात धडकली. या धडकेत दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर चालक वैभव मिश्रा गंभीर जखमी झाले होते.
अपघात उत्तर प्रदेशातील दोहरीघाट पोलीस ठाणे क्षेत्रात घडला होता. अपघातानंतर मिश्रा यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र सोमवारी सकाळी त्यांचाही मृत्यू झाला.
या अपघातामुळे कालिदास संस्कृत विद्यापीठ तसेच शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.