नागपूर : राखीचा सण म्हणजे नुसती धाग्याची गाठ नाही, तर बहिणीच्या प्रेमाची, भावाच्या जबाबदारीची आणि परस्पर विश्वासाची अनमोल खूण असते. श्रावण पौर्णिमेला येणारा रक्षाबंधन सण भावंडांमधील नातं घट्ट करणारा आणि संस्कृती जपणारा दिवस आहे. या दिवशी काही गोष्टींचे पालन केल्यास सण अधिक शुभ होतो, तर काही चुका टाळणे आवश्यक असते. चला तर मग पाहूया, यंदाच्या रक्षाबंधनात कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात.
रक्षाबंधनाला काय करावे?
सकाळी लवकर उठून स्नान व पूजा करा-
शुभ सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून स्वच्छ व पारंपरिक वस्त्र धारण करा. नंतर घरातील दैवतांची – श्रीकृष्ण, श्रीराम, गणपती किंवा कुलदैवतांची भक्तिभावाने पूजा करा.
राखी बांधण्यासाठी योग्य मुहूर्त निवडा-
भाद्र काळ टाळून पंचांगानुसार योग्य वेळेत राखी बांधावी. शुभ मुहूर्तात राखी बांधल्यास त्याचे आध्यात्मिक व मानसिक लाभ अधिक मिळतात.
ओवाळणीसह राखी समर्पण करा-
राखी बांधण्यापूर्वी भावाला ओवाळा, टिळा लावा व मिठाई भरवा. हा संपूर्ण विधी प्रेम, आदर आणि आनंदाने पार पाडावा.
भावाची बहिणीला रक्षणाची ग्वाही-
राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला एखादी भेटवस्तू देऊन तिच्या रक्षणाची प्रतिज्ञा करतो. हे वचन फक्त सणापुरतं मर्यादित न राहता, आयुष्यभर जपावं.
घरच्यांचे आशीर्वाद मिळवा-
पूजेनंतर घरातील मोठ्यांच्या पायांवर डोकं ठेवून आशीर्वाद घ्या. रक्षाबंधन हा कुटुंबाला एकत्र आणणारा सण आहे – तो प्रेम, संवाद आणि जिव्हाळ्याने साजरा व्हावा.
रक्षाबंधनाला काय टाळावे?
भाद्र काळात राखी न बांधणे-
भाद्र काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे राखी बांधण्यापूर्वी शुभ वेळ पाहणे अत्यावश्यक आहे.
वाद, राग आणि नकारात्मकता टाळा-
हा दिवस सौहार्दाचा आहे. मनात कटुता, वाद किंवा ईर्षा असतील तर त्या बाजूला ठेवून सण साजरा करा.
राखी जमिनीवर ठेवणे टाळा-
पूजेच्या वेळी राखी किंवा रक्षासूत्र जमिनीवर ठेवू नका. ती स्वच्छ, उंच स्थळी ठेवणे शुभ मानले जाते.
मांसाहार व अपवित्र पदार्थांचे सेवन नको-
रक्षाबंधन हा सात्विकतेचा दिवस आहे. म्हणूनच या दिवशी मांसाहार, मद्यपान यांसारख्या गोष्टी टाळाव्यात.
पूजेतील विधी हलक्याच घेऊ नका-
आरती, तिलक, मंत्रोच्चार हे केवळ औपचारिकतेसाठी नसतात. प्रत्येक विधी मन लावून आणि श्रद्धेने करा, तेव्हाच त्याचा खरा अर्थ उमगतो.
दरम्यान रक्षाबंधन म्हणजे नात्यांची आठवण करून देणारा, प्रेमाने भरलेला एक पवित्र दिवस. हे नातं फक्त राखीपुरतं न राहता, विश्वास, आदर आणि जबाबदारीने भरलेलं असावं. यंदाचा रक्षाबंधन सण तुमच्या कुटुंबात प्रेम, आनंद आणि एकतेचा धागा अधिक मजबूत करील, हीच सदिच्छा!