Published On : Fri, Aug 16th, 2019

विधवा स्त्रीला बंधुत्वप्रदान करून दिली रक्षाबंधनची भेट

Advertisement

कर्मयोगी फौंडेशन चे अध्यक्ष पंकज ठाकरे यांची रक्षाबंधन भेट
विधवा स्त्रीला आधार देण्याचा प्रयत्न

नागपूर: अगदी तारुण्यात पतीच्या अवकाळी मरणाने सौभाग्यवतीची गंगा भागीरथी झालेल्या सपना पांडुरंग पाटील या २८ वर्षीय विधवेला १० हजार रुपयांची भेट व तिची साडीचोळी करून एका विधवा स्त्रीला बंधुत्व प्रदान करून रक्षाबंधनची भेट देण्याचे कार्य बुटी बोरी येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज ठाकरे यांनी आपल्या कर्मयोगी फौंडेशन च्या माध्यमातून दि १५ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या पर्वावर केले.

अगदी कोवळ्या वयात वयाच्या १९ व्या वर्षी लग्न होऊन सासरी आलेली सपना.तिची एकच इच्छा नवरा गरीब असला तरी चालेल पण कष्टीक असावा.हातावर आणू व पानावर खाऊ असा समाधानी बाणा. पण नवऱ्याने गरिबीचं समाधान दारूच्या बाटलीत शोधलं.त्यातही सासू ला दुर्धर असा कॅन्सर. नवऱ्याने दिवसभर दारू ढोकसायची व पडून राहायचं.त्यामुळे सपणाला सासूबाईंचे आजारपण सांभाळून दिवसभर शेतात राबत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करावा लागायचा.घरची दोन एकर शेती त्यातही चार भावांचे हिस्से. एक वर्ष सवंगडी ठेवून शेती केली पण त्यातून खर्चही निघाला नाही. अशातच सपना भावाच लग्न असल्याने लग्नाला आपल्या दोन मुलासोबत गेली, नवऱ्यालाही बोलावलं पण ते गेले नाही. नवरदेव घोडी चढला आणि बातमी आली की पांडुरंगरावांनी विहरीत उडी टाकून आत्महत्या केली. भावाचं लग्न टाकून सपना व सर्व मंडळी गावाला पोहोचली व क्रियाक्रम केला. वडिलांनी सपना ला माहेरी नेले.

पण काही दिवसानंतर तीथलाही ओलावा भावाच्या लग्नानंतर आटला. शेवटी सपना पिंपरीला आली व सासूच्या नावावर असलेल्या पडक्या घरात राहू लागली.

आज सपना च्या नावावर जागा नसल्याने त्यांना सरकारचे घरकुल मिळत नाही.”आपलीच माणस वैरी झाली” अशा अवस्थेत आपल्या दोन्ही मुलाच्या भविष्याचा व आपल्या पुढील जीवनाचा डोलारा खंबीरपणे वाहत सपना आपले जीवन यापन करीत असतानाच एकल फाऊंडेशनच्या कविता मॅडम कडून कर्मयोगी फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज ठाकरे यांना सपना पाटील यांची दुःखद कहाणी कळताच कर्मयोगी फाऊंडेशनचे सरचिटणीस शिवाजी बारेवार, कोषाध्यक्ष विजय डोंगे, तुळशीदासजी भानारकर व केंद्रीय कार्यकारीणी होकार देताच एका विधवा बहिणीला मदत व बंधुत्व देण्याकरिता एक नव्हे तर पाच फोरव्हीलर घेवुन जवळपास २५ जण पिंपरीला पोहोचले.त्यात बोरखेडीचे सरपंच, राजुभाऊ घाटे, योगेश नंदनवार, ब्राम्हणीच्या सरपंच माधुरीताई घोडमारे,शिवाजी बारेवार, टिकेश्वर पारधी, तुळशीदासजी भानारकर, विजय डोंगे,रामदासजी राऊत, इस्माईल शेख, दिनेश झाडे, संजय खुबाळकर, शरद कबाडे, सुनील विश्वकर्मा, शैलेंद्र पाटील, शेषरावजी पारशे, अशोक ठाकरे, देविदास ठाकरे, डॉ. भीमराव मस्के हे सर्व जण पिपरीला पोहचून सपना पाटील या आपल्या बहिनीकडून राख्या बांधून घेतल्या.व या सर्व बांधवानी सपनाच्या ओवाळणीत १० हजार रुपये तसेच तिला साडीचोळी देऊन बहुसंख्य बंधुत्व प्रदान केले.व भविष्यात तिला राहण्यासाठी निवारा व येनाऱ्या सर्व संकटात हे सर्व भाऊ संकटासमोर अभेद्य भिंत म्हणून उभे राहण्याची सपना ला ग्वाही दिली.

संदीप बलविर